रोजचे उत्पन्न ९० लाख, ठेकेदारांवर खर्च दीड कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजचे उत्पन्न ९० लाख, ठेकेदारांवर खर्च दीड कोटी
रोजचे उत्पन्न ९० लाख, ठेकेदारांवर खर्च दीड कोटी

रोजचे उत्पन्न ९० लाख, ठेकेदारांवर खर्च दीड कोटी

sakal_logo
By

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ ः पीएमपीचे रोजचे सरासरी उत्पन्न एक कोटी ५० लाख रुपये असून त्यापैकी ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात. मात्र ठेकेदारांच्या ८५० बससाठी पीएमपीला रोज एक कोटी ५० लाख रुपये द्यावे लागतात. आता आवश्यकता नसताना पीएमपीकडे सात मीटर लांबीच्या ३०० नव्या ई-बस देण्यात येणार आहे. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रति किमी ७० रुपये दर आकाराला जाणार आहे. त्यामुळे पीएमपीला या ३०० ई-बससाठी रोज सुमारे ३२ लाख रुपये ठेकेदारांना द्यावे लागतील. त्यातच सध्या पीएमपीचा वर्षाला संचित तोटा ७१० कोटी इतका आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्तरांवर सात मीटर लांबीच्या ३०० बस घेण्याचे नियोजन सुरु झाले. दोन दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत या संदर्भात बैठक झाली. सात मीटर ई-बसची रक्कम एक कोटी रुपये आहे. ३०० बसपैकी १०० बससाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रत्येक बससाठी ३५ लाख रूपये तर २०० बससाठी पुणे महापालिका प्रत्येक बससाठी ३५ लाख रुपये देणार आहे. उर्वरित ६५ लाखांची रक्कम ठेकेदार भरणार आहे. पण, त्यावर मालकी मात्र ठेकेदारांची असेल.
पहिल्या टप्प्यात झालेल्या चर्चेनुसार, एका बसच्या एक किलोमीटरसाठी पीएमपीने ठेकेदारांना ७० रुपये देण्याचे ठरले. एक बस दिवसभरात १५० किमी धावणार आहे. त्याप्रमाणे विचार केला ३०० बससाठी पीएमपीला सुमारे ३२ लाख रुपये ठेकेदारांना द्यावे लागणार आहे. महिन्याला हा आकडा १० कोटींच्या घरात जातो. तेव्हा ठेकेदारांपेक्षा पीएमपी प्रशासनाने स्वतःच्या मालकीच्या बस घेणे फायदेशीर ठरेल. मात्र, राजकीय दबावामुळे पीएमपीला आवश्यकता नसताना छोट्या आकाराच्या बस दिल्या जात असल्याची चर्चा आहे.

३०० बसची गरज आहे का ?
सध्या पीएमपीच्या ५० ‘पुण्यदशम’ बस शहराच्या मध्य भागात धावत आहेत. यातून दररोज सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मेट्रोसाठी फिडर सेवा सुरु झाली; मात्र प्रवासी संख्या नसल्याने ती काही दिवसांतच बंद करावी लागली. पुण्यात मेट्रो पूर्ण क्षमतेने धावण्यास किमान दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सिंहगडासाठी अद्याप कोणतेच नियोजन नाही. असे असताना एकावेळी ३०० बस घेऊन करणार काय? फिडर सेवेचा वा अन्य बाबींचा विचार केला तर ५० ते १०० बसची संख्या ठीक आहे. शिवाय बसच्या आसन क्षमता कमी असल्याने प्रवासी वाहतूक कमी होणार आहे.

याचा विचार केला तर :
दिवसाकाठी केवळ ठेकेदारांना एक कोटी ५० लाख रुपये द्यावे लागतात. ठेकेदारांच्या बसचे चार्जिंग डेपोत होते. वीज बिलाचा खर्च पीएमपी करते. वाहाकांचा पगार, जागेचा वापर आदी विचार केला तर ठेकेदारांच्या बसवर दिवसाला सुमारे दोन कोटी रुपये खर्च होतो.

पीएमपीचा ‘प्रवास’

१६५०
एकूण बस संख्या

८५०
ठेकेदारांच्या बस

८००
पीएमपीच्या मालकीच्या बस

१ कोटी ५० लाख
रोजचे प्रवासी उत्पन्न (सरासरी)

१० ते ११ लाख
प्रवासी संख्या

४५००
बस थांबे