रेबीजचे मृत्यू शून्यावर आणणे शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेबीजचे मृत्यू शून्यावर आणणे शक्य
रेबीजचे मृत्यू शून्यावर आणणे शक्य

रेबीजचे मृत्यू शून्यावर आणणे शक्य

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : ‘‘रेबीज हा एक दुर्लक्षित आजार असला तरी त्यामुळे देशांमध्ये आणि राज्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. हे मृत्यू २०३० पर्यंत शून्यावर आणणे सहज शक्य आहे. पण, त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यामधील समन्वय, ‘वन हेल्थ’ संकल्पनेनुसार करावयाची कार्यवाही, कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबाबत जनप्रबोधन आणि रेबीज प्रतिबंधक लस तसेच सिरम यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल,’’ असे मत आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या जागतिक रेबीज दिवसाच्या निमित्ताने ते बोलत होते. लुई पाश्चर यांचा मृत्यूदिन जागतिक रेबीज दिवस म्हणून दरवर्षी २८ सप्टेंबर साजरा करण्यात येतो. ‘वन हेल्थ झिरो डेथस’ हे या वर्षीच्या रेबीज दिनाचे घोषवाक्य होते. महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाठसुते, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषधशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मालन परांडे, राज्य माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ. अशोक रणदिवे आणि राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप उपस्थित होते. ‘‘रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,’’ असे पाठसुते यांनी येथे सांगितले.
डॉ. मालन परांडे यांनी सांगितले की, लोकांनी श्वान दंशावर पारंपरिक उपचार न घेता लस आणि सिरम वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतले तर रेबीज निर्मूलन सहजशक्य आहे.’’ डॉ. कैलास बाविस्कर यांनी यावेळी सार्वजनिक आरोग्य संदर्भातील कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य शिक्षण हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठ नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी तसेच विविध विभागातील आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोक उपस्थित होते. रूपेश दरेकर आणि श्रावणी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. भालचंद्र प्रधान यांनी आभार मानले.