विद्यापीठात ‘डिग्री प्लस’ अंतर्गत ऑनलाईन, निःशुल्क अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात ‘डिग्री प्लस’ अंतर्गत 
ऑनलाईन, निःशुल्क अभ्यासक्रम
विद्यापीठात ‘डिग्री प्लस’ अंतर्गत ऑनलाईन, निःशुल्क अभ्यासक्रम

विद्यापीठात ‘डिग्री प्लस’ अंतर्गत ऑनलाईन, निःशुल्क अभ्यासक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात तयार करण्यासाठी ‘डिग्री प्लस’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. ३०० ते ३५० जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध असून काही अभ्यासक्रम निःशुल्क आहेत.

नोव्हेंबर २०२१ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘डिग्री प्लस’ उपक्रमाची सुरुवात झाली. यासाठी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक व सामाजिक संस्थांसोबत विद्यापीठाने करार करत हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले. यामध्ये हार्वर्ड बिझनेस ऑनलाइन, एडब्लूएस, सिंपली लर्न, सेलिब्रिटी स्कूल यांसह आयबीएम, स्टँनफर्ड युनिव्हर्सिटी यांसारख्या संस्था, विद्यापीठे आणि कंपन्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश ‘डिग्री प्लस’मध्ये आहे. हे सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन असून यातील काही अभ्यासक्रम निःशुल्क आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती, तर पाच हजार विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला होता.

डिग्री प्लसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कम्प्युटिंग, अर्थशास्त्र, संस्कृती अशा विषयातील अद्ययावत ज्ञान घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
- http://degreeplus.in

अभ्यासक्रम कोणासाठी?
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी
- विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील पदवी करत असलेले विद्यार्थी

अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा कालावधी कोणता?
- हे अभ्यासक्रम वर्षभर सुरू असतात. याचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.