मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा चालना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा चालना
मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा चालना

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा चालना

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीचा प्रवास गेल्या आठवड्याभरापासून थांबला होता. त्यास गुरुवारी (ता. २९) पुन्हा चालना मिळाली आहे. दरम्यान मॉन्सूनने गुरुवारी वायव्य भारतातील आणखीन काही भागातून परतल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.
पोषक हवामानामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला २० सप्टेंबरला सुरवात झाली होती. त्यावेळी मॉन्सून गुजरात व राजस्थानच्या काही भागातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर मॉन्‍सूनच्या परतीचा प्रवास आठवडाभरापेक्षा अधिक काळासाठी थांबला होता. त्यात यंदा मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली होती. परतीच्या प्रवासाला सुरवात झाल्यानंतर पुन्हा त्यास ‘ब्रेक’ लागला, व मॉन्सूनच्या परतीची सीमा तशीच कायम होती. परंतु गुरुवारी परतीच्या प्रवासाला पुन्हा वेग आला असून मॉन्सून संपूर्ण पंजाब, चंडीगड, दिल्ली तसेच जम्मू काश्‍मीर, हरियाना, हिमाचल प्रदेशसह उत्तर प्रदेशच्या काही भागातून तर राजस्थानच्या आणखीन काही भागातून परतला आहे. दरम्यान मॉन्सूनच्या परतीची सीमा आता जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालियापर्यंत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

हवामानाची सद्यःस्थिती
- आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती
- पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापासून दक्षिण आतील कर्नाटकापर्यंत पूर्व-पश्चिम कमी दाब पट्टा सक्रिय
- ईशान्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागर परिसरावर येत्या शनिवारपर्यंत (ता. १) चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता