गुळात साखरेची भेसळप्रकरणी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळात साखरेची भेसळप्रकरणी कारवाई
गुळात साखरेची भेसळप्रकरणी कारवाई

गुळात साखरेची भेसळप्रकरणी कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : गुळामध्ये साखरेची भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, तेथून ५० हजार ९०० रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच, गुळाचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) देण्यात आली.
उसाचा रस आटवून त्यापासून गूळ तयार केला पाहिजे. त्यात कोणतेही अपमिश्रक टाकणे हा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा आहे. या पार्श्वभूमिवर ‘एफडीए’ने गेल्या वर्षभरापासून सातत्याने या बाबत जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, वेळोवेळी तपासण्या करून गूळ उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, यानंतरही महाराज गूळ उद्योगामध्ये (बोरीपार्धी, ता. दौंड) गुळात साखरेची भेसळ करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर येथे टाकलेल्या छाप्यात ३२४ किलो (२८ हजार ८०० रुपये) आणि ६५० किलो साखरेचा (२२ हजर १०० रुपये) असा ५० हजार ९०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. येथे अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने विक्रेत्यास २० हजार रुपये तडजोड शुल्क इतका दंड आकारण्यात आला आहे. भेसळीच्या अशा प्रकारांची माहिती असल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन ‘अन्न व औषध प्रशासन’च्या पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

लवकरच विशेष मोहीम
गुळात होणाऱ्या साखरेतील भेसळीबाबत ‘एफडीए’ला गोपनीय माहिती मिळत आहे. काही तक्रारीही दाखल होत आहेत. त्यामुळे प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ‘एफडीए’तर्फे देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना घेऊन गूळ उत्पादन करावे, असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.