पाणी पुरवठा विस्कळित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठा विस्कळित
पाणी पुरवठा विस्कळित

पाणी पुरवठा विस्कळित

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः पुणे महापालिकेतर्फे जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी अनेक वेळा शहरातील पाणी पुरवठा बंद केला जातो. तरीही विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन पाणी पुरवठा विस्कळित होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण कोथरूड, कर्वेनगर, वारजे, डेक्कन, प्रभात रस्ता, येरवडा, विश्रांतवाडी यासह इतर भागातील नागरिकांना संपूर्ण दिवस पाण्याविना काढावा लागला.
ऐन सणासुदीच्या दिवसांत पुणे शहरातील पाणी पुरवठा विस्कळित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पेठांमधील पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. गुरुवारी संपूर्ण कोथरूड, कर्वेनगर, येरवडा विश्रांतवाडी या भागातील पाणी सकाळपासून गायब झाले. ठरलेल्या वेळेला पाणी न आल्याने नागरिकांचे वेळापत्रक बिघडले. ऑफिसला जाण्याची गडबड असताना, नवरात्र सुरू असताना पाणी न आल्याने नागरिकांची धांदल उडवली. नेमके पाणी का आले नाही याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानेही काहीच स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला.
वारजे जलकेंद्रावरून कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, एरंडवणे यासह इतर भागात पाणी पुरवठा होतो. तसेच वारजे वरून होळकर केंद्रावर पाणी दिले जाते. तेथून येरवडा, विश्रांतवाडी भागातील पंचशील नगर, कस्तुरबा सोसायटी, प्रतिकनगर, मोहनवाडी यासह इतर भागात पाणी आलेच नाही. वारजे जलकेंद्रात विद्युत विषयक दुरुस्तीचे काम संध्याकाळी सातच्या सुमारास संपले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागात पाणी पुरवठा सुरू केला. पण नागरिकांना संपूर्ण दिवस पाण्याविना काढावा लागला.

वारजे जलशुद्धीकरण केंद्र येथे रात्री अकरा वाजता वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे एक तास तेथील प्रक्रिया ठप्प झाली. वीज आल्यानंतर हायटेंशन केबल व बेक्रर खराब झाला. त्यामुळे पुन्हा जलशुद्धीकरण बंद झाले. त्यामुळे या केंद्रावर अवलंबून असलेला कोथरूड, डेक्कन, येरवडा यासह इतर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला. संध्याकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने पाणी सुरू करण्यात आले आहे. पण शुक्रवारी सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा

पाणी जीवनावश्यक बाब आहे. त्याबाबत, पाणी येणार नसल्याची तातडीने माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. पालिकेकडून तसा मेसेज अद्याप आलेला नाही. शुक्रवारी पाणी येणार की नाही याबाबत ठोस माहिती मिळत नाही.
- तीतीक्षा नगरकर, बावधन