पुणे जिल्हा बॅंकेला ‘अच्छे दिन’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्हा बॅंकेला ‘अच्छे दिन’!
पुणे जिल्हा बॅंकेला ‘अच्छे दिन’!

पुणे जिल्हा बॅंकेला ‘अच्छे दिन’!

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी (पीडीसीसी) लॉकडाउन संपल्यानंतरचे पहिले आर्थिक वर्ष (२०२१-२२) मोठे ‘लकी’ ठरले आहे. या वर्षात बॅंकेच्या एकूण ठेवीत, ढोबळ नफ्यात आणि निव्वळ नफ्यात विक्रमी वाढ झाली आहे. सरत्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) ठेवींमध्ये ५९ कोची ६१ लाख रुपयांनी वाढ झाली असून यामुळे एकूण ठेवी या आता सुमारे साडेअकरा हजार कोटींच्या घरात पोचल्या आहेत. या वर्षात जिल्हा बॅंकेला तब्बल ३४९ कोटी ३८ लाख रुपयांचा ढोबळ तर, ६८ कोटी ६८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ठेवी वाढल्यामुळे जिल्हा बॅंकेला आता कर्ज वितरणाच्या रकमेत वाढ करणे सोपे होणार आहे. शिवाय याचा फायदा हा शेतकरी आणि अन्य सभासदांना होऊ शकणार आहे.
देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून याआधीच पुणे जिल्हा बॅंकेने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यातच आता देशातील सर्वाधिक ठेवी असलेली बॅक म्हणूनही आता जिल्हा बॅंकेने नवी ओळख निर्माण केली आहे. याआधीचे आर्थिक वर्षे (२०२०-२१) हे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे मोठे अडथळ्याचे ठरले होते. मात्र या संकटाच्या काळातसुद्धा ठेवींमध्ये वाढ करण्यात ही बॅंक यशस्वी ठरली होती, असे बॅंकेचे अघ्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत ११ हजार ३२९ कोटी ९९ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. त्या आता सरत्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) ११ हजार ३८९ कोटी ६० लाख रुपयांच्या झाल्या आहेत. मागील तीन आर्थिक वर्षांपासून सातत्याने बॅंकेच्या ढोबळ नफ्यात वाढ होत आहे. यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षात बॅंकेला २७४ कोटींचा ढोबळ नफा झाला होता. त्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात आणखी साडेआठ कोटी रुपयांची वाढ होऊन तो २८२ कोटी ५१ लाख रुपये झाला होता. त्यात आता आणखी ६६ कोटी ८७ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

आकडे बोलतात
- बॅंकेची सभासद संख्या --- ११ हजार पाच
- एकूण सभासदांपैकी सहकारी संस्था सभासद --- ९ हजार २७०
- व्यक्ती सभासद --- १ हजार ७३५
- विविध संवर्गांना एकूण कर्ज वाटप --- ७ हजार ५६६ कोटी २५ लाख रुपये
- एकूण गुंतवणूक --- ७ हजार १९७ कोटी ८१ लाख रुपये


पुणे जिल्हा बॅंकेने सलग तिसऱ्या आर्थिक वर्षात ठेवी, ढोबळ नफा, गुंतवणूक, कर्ज वाटप, कर्ज वसुली, भागभांडवल आणि नेट वर्थ या सर्वच बाबींमध्ये देशात नवा उच्चांक केला आहे. विशेष म्हणजे या तीनही वर्षात देशात कोरोनाचे संकट असतानासुद्धा ठेवी आणि ढोबळ नफ्यात उच्चांकी वाढ होणारी पुणे ही एकमेव जिल्हा बँक ठरली आहे. बॅंकेचे ठेवीदार, कर्जदार, खातेदार, शेतकरी सभासद आदींनी बॅंकेवर दाखवलेला विश्‍वास व सदिच्छांमुळेच हे शक्य होऊ शकले आहे.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बॅक, पुणे