होर्डिंगमालकांची मुजोरी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होर्डिंगमालकांची मुजोरी कायम
होर्डिंगमालकांची मुजोरी कायम

होर्डिंगमालकांची मुजोरी कायम

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, राजकीय वरदहस्तामुळे शहरात हजारो बेकायदा होर्डिंग उभे राहिल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. या बेकायदा होर्डिंगवर कारवाई करून ५० हजार रुपये दंड वसूल करण्याचा नियमही तयार केला. त्यानुसार १८७ होर्डिंग काढण्यात आले. तरीही होर्डिंगमालकांची मुजोरी कायम असून, १८७ पैकी केवळ तिघांनीच ५० हजार रुपये दंड भरला आहे. हे पैसे वसूल करतानाही प्रशासन हतबल झाले आहे.
शहरात होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व जाहिरात प्रदर्शित नियमन व नियंत्रण कायद्यानुसार परवानगी दिली जाते. त्यासाठी होर्डिंग लावताना प्रति चौरस मिटर २२२ रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते. वाहतुकीला अडथळा होणार नाही, इमारतीच्या खिडक्या, दार बंद होणार नाही. इमारतीमध्ये प्रवेश व बाहेर जाण्यासाठीच्या मार्गाला अडथळा होणार नाही यासह इतर अटींची पूर्तता केल्यानंतर लोखंडी सांगाड्याची सुरक्षितता तपासल्यानंतर महापालिकेकडून होर्डिंगला परवानगी दिली जाते. सध्या शहरात २ हजार ३४८ अधिकृत होर्डिंग असून, त्यातून २९ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
गेल्या काही वर्षात आकाश चिन्ह विभागाने दुर्लक्ष केल्याने अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासकीय जागांसह खासगी जागा, इमारतींवर मोठमोठे होर्डिंग उभारले गेले. हे होर्डिंग उभारताना उंचीचे व रुंदीच्या आकाराच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. एकमेकांना खेटून होर्डिंग उभे करून ते स्वतंत्र दोन होर्डिंग असल्याची चलाखी केली आहे. पण या दोन होर्डिंगवर एकच जाहिरात लावली जाते. शहरातील अनधिकृत होर्डिंग शोधून काढणे, त्यावर कारवाई करणे, अधिकृत करून शुक्ल भरून घेणे यासाठी ‘सार’ नावाच्या संस्थेची नियुक्ती महापालिकेने केली. जे एकूण उत्पन्न मिळेल त्याच्या ६ टक्के या कंपनीला मोबदला दिला जाणार आहे. या संस्थेने १५ क्षेत्रीय कार्यालयांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार शहरात एक हजार ९६५ अनधिकृत होर्डिंग आहेत. त्यावर आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या दरम्यान १८७ होर्डिंग काढले आहेत.

अशी झाली कारवाई
महिना व काढलेले अनधिकृत होर्डिंग
एप्रिल - ६
मे - १४
जून - ७६
जुलै - १७
आॅगस्ट - ४६
सप्टेंबर - २८

तक्ता
क्षेत्रीय कार्यालय - अधिकृत होर्डिंग - अनधिकृत होर्डिंग
नगर रस्ता - २९६ - ७६९
येरवडा - ८४ - ३५
ढोले पाटील - ३२३ - ७
औंध - २८४ - ३५
शिवाजीनगर - ३८५ - ६
कोथरूड - १२० - १०९
सिंहगड रस्ता - १६४ - ५०
धनकवडी - ४६ - २
वारजे - ९१ - ११
वानवडी - ९१ - ५४
हडपसर - ११० - ६२७
कोंढवा - १०४ - २५९
कसबा-विश्रामबाग - १६० - ०
भवानी पेठ - २४ - ०
बिबवेवाडी - ६६ - ०


शहरातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केले आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे.आतापर्यंत १८७ होर्डिंग काढून टाकले आहेत. पण, हे होर्डिंग काढल्यानंतर संबंधित जागा मालकाकडून ५० हजार रुपये दंड भरून घेणे आवश्‍यक आहे. हा दंड भरला जात नसल्याने संबंधित जागा मालकाच्या मिळकतकरातून ही रक्कम वसूल केली जाईल. त्यासाठी मिळकतकर विभागाला पत्र दिले जाणार आहे.
- माधव जगताप,
उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग


मुजोरीला आळा घाला
पुणे शहरात होर्डिंगमालकांची मुजोरी कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. १८७ पैकी तिघांनीच दंड भरला आहे. दंडाचे पैसे वसूल करताना प्रशासन हतबल होत आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.