शास्त्रीय संगीतातील गीतांनी सजताहेत मैफली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शास्त्रीय संगीतातील गीतांनी सजताहेत मैफली
शास्त्रीय संगीतातील गीतांनी सजताहेत मैफली

शास्त्रीय संगीतातील गीतांनी सजताहेत मैफली

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः सध्या सुरु असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र ऊर्जेने भारलेले आणि चैतन्यदायी वातावरण आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आलेल्या या उत्सवात निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहेत. त्यात बहुतांश ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर होत असून रेकॉर्डेड गाणीही काही ठिकाणी वाजत आहेत. संगीत आणि अध्यात्माचा जवळचा संबंध असल्याने संगीताने ऊर्जा मिळते. त्यामुळे या काळात संगीताद्वारे आत्मिक आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती मिळते, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे सर्वच सण-उत्सव निर्बंधांच्या छायेत साजरे झाले. यंदा मात्र निर्बंधमुक्त वातावरण असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून त्यात प्रसिद्ध गायकांना संगीत मैफलींसाठी आमंत्रित केले जात आहे. भक्तिगीते, भावगीते यांसह शास्त्रीय संगीतातील गीतांनी या मैफली सजत आहेत.
याबाबत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे म्हणाले, ‘‘भारतीय संगीत आणि अध्यात्म यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. असे म्हणतात की संगीत हा अध्यात्माच्या अतिशय जवळचा मार्ग आहे आणि ते योग्यही आहे. कारण, तुम्ही जेव्हा संगीत साधना करता, त्यावेळी तुम्ही स्वतःला त्या संगीताच्या सुरांमध्ये समर्पित करता. गायन असोत की श्रवण असोत, संगीतातून तुम्हाला स्वतःला विसरण्याची अनुभूती मिळते. भारतीय संगीताचा हेतू हा केवळ मनोरंजन नाही तर संगीताच्या माध्यमातून प्रबोधन आणि चित्तशांती हा देखील आहे.’’

सण-उत्सवांच्या काळातील वातावरण वेगळेच असते. या वातावरणात तुम्हाला चैतन्य जाणवते. त्यामुळे इतरवेळी होणाऱ्या मैफली आणि या काळातील मैफली, यात फरक असतो. या काळात सादरीकरण करताना तुम्हाला अनेकदा परमेश्वरी तत्त्वाशी जोडले गेल्याचा अनुभव येतो. त्यामुळे यातून मिळणारे आत्मिक समाधान निराळेच असते. सण-उत्सव आणि संगीत, हे दोन्ही माणसांना जोडण्याचे काम करतात.
- राजेश दातार, गायक-संगीतकार