मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान
मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान

मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘‘मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले, ते पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात नागरिकांची गर्दी वाढली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. त्याबाबतही बोलत रहा,’’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
आदित्य ठाकरे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरासह शहरातील विविध मंडळांना भेटी दिल्या. महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘खोके सरकारने टीका करणे, हे आता हास्यास्पद झाले आहे. आजही पुणे जिल्ह्यात येताना वेदांताचा प्रकल्प राज्यातून गेल्याचे दु:ख वाटत आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकारमुळेच हे घडले आहे.’’
दसरा मेळाव्याबाबत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून व्हिडिओ समोर येत आहेत. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘‘अनेक लोक मेळावे घेऊ शकतात. मात्र, परंपरेनुसार शिवतीर्थावर आमचा शिवसेनेचा मेळावा होणार आहे. राज्यात शिवसंवाद यात्रा सुरू असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे.’’
रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, ‘‘मी वेडे-वाकडे आरोप करणाऱ्यांवर कधी बोलत नाही. माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत.’’

आदित्य ठाकरेही अडकले वाहतूक कोंडीत
आदित्य ठाकरे हे भांडारकर रस्त्यावर रात्री पावणेआठच्या सुमारास सुमारे २० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकले. त्यांच्यासोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा ताफा उलट दिशेने आल्यामुळे कोंडीत भर पडली, असा आरोप काही स्थानिक रहिवाशांनी केला. त्याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला. भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता आणि बीएमसीसी रस्त्यावर पावसामुळे झाडे पडल्याने रहदारीचा खोळंबा झाला होता. सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही कोंडी कायम होती. पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे विनायक नवयुग मित्रमंडळ ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
आदित्य ठाकरे यांनी रात्री हॉटेल मेरिएटमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत दसरा मेळाव्याचे आयोजन तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले, असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.