‘रुपी’ला सर्वोच्च दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रुपी’ला सर्वोच्च दिलासा
‘रुपी’ला सर्वोच्च दिलासा

‘रुपी’ला सर्वोच्च दिलासा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० : रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करून त्यावर अवसायक नेमण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवला. बँकेबाबत अर्थमंत्रालयाकडे दाखल असलेल्या अपिलाची सुनावणी होईपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन एकप्रकारे आरबीआयला दणका दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने ८ ऑगस्ट रोजी रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ सप्टेंबरपासून रुपी बँक अवसायनात काढण्यात येणार होती. मात्र, उच्च न्यायालयात रुपी बँकेने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होऊन न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी या आदेशाला १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. त्यावर आरबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयी याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर अर्थमंत्रालयाकडील दाखल अपिलाची सुनावणी होईपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचे आदेशही दिले.
दरम्यान, आरबीआयच्या बँक अवसायनात काढण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी रुपी बँकेने अर्थ मंत्रालयाचे सहसचिव यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर १९ सप्टेंबरला सुनावणी झाली. मात्र, अंतरिम स्थगिती नाकारून सुनावणीची पुढील तारीख १७ ऑक्टोबर देण्यात आली आहे. मात्र, आरबीआयने ही सुनावणी ४ ऑक्टोबरला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. बँकेच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरबीआयचा रुपीबाबतचा हेतू शुद्ध नसल्याचा युक्तीवाद केला. त्यावर सर्वोच्च न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी रुपीबाबत अर्थमंत्रालयाकडील सुनावणी होईपर्यंत आरबीआयच्या बँक अवसायनात काढण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे रुपी बँक अवसायनात काढण्याच्या आरबीआयच्या प्रयत्नांना सध्यातरी खीळ बसली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अतिशय आशादायक व स्वागतार्ह आहे. बँकेवर झालेल्या अन्यायाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला आहे. त्यामुळे रुपी बँकेची समस्या सोडण्यासाठीची शक्यता बळावली आहे. आगामी काळात चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे.
- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बँक