‘प्रधानमंत्री कौशल्य’कडे विद्यार्थ्यांची पाठ? राज्यातील प्रवेशसंख्या चार वर्षांत सात लाखांवरून २७५ पर्यंत खाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रधानमंत्री कौशल्य’कडे विद्यार्थ्यांची पाठ?
राज्यातील प्रवेशसंख्या चार वर्षांत सात लाखांवरून २७५ पर्यंत खाली
‘प्रधानमंत्री कौशल्य’कडे विद्यार्थ्यांची पाठ? राज्यातील प्रवेशसंख्या चार वर्षांत सात लाखांवरून २७५ पर्यंत खाली

‘प्रधानमंत्री कौशल्य’कडे विद्यार्थ्यांची पाठ? राज्यातील प्रवेशसंख्या चार वर्षांत सात लाखांवरून २७५ पर्यंत खाली

sakal_logo
By

पुणे, ता. १ : राज्यातील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने घटली आहे. कोरोनापूर्वी म्हणजेच २०१९-२० मध्ये तब्बल सात लाख ६० हजार ६४९ विद्यार्थी योजनेत सहभागी झाले होते. तर यावर्षी फक्त २७५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवली का काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

कौशल्य विकास मंत्रालयाने लोकसभेच्या अधिवेशनात प्रसिद्ध केलेल्या एका उत्तरात ही आकडेवारी समोर आली आहे. स्कील इंडिया अभियानांतर्गत मंत्रालयातर्फे हा महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. राज्यात तब्बल एक हजार ९०१ केंद्रांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे आणि त्यांच्यातील अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा म्हणून २०१५-१६ पासून ही योजना राबविण्यात येते. राज्यात आतापर्यंत ९ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, कोरोनाकाळात आणि त्यानंतरही विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

निष्कर्ष
- कोरोनाकाळात विद्यार्थीसंख्येत सर्वाधिक घट
- २०१९-२० या शैक्षणिक वर्षात राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले
- कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांमध्ये दीर्घकालीन कार्यानुभवाचा अभाव
- रोजगारक्षम प्रशिक्षणासाठी सुरुवातीपासूनच उद्योगांचा सहभाग आवश्यक
- विद्यार्थ्यांनीही अधिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबर प्रत्यक्ष कार्यानुभवावर भर द्यावा

(स्तंभालेख करावा)
राज्यातील ‘पीएमकेव्हीवाय’मधील विद्यार्थ्यांची स्थिती
वर्ष नोंदणी प्रशिक्षण घेणारे प्रमाणपत्र प्राप्त
२०१८-१९ १८०३७२ १६५३५२ ८९५७०
२०१९-२० ७६०६४९ ६३७००२ ४३०५१०
२०२०-२१ १५२२२ १४८३५२ २५९७४२
२०२१-२२ ४९४७९ ३९८६४ ३१५२१
२०२२-२३ २७५ १२४४४ १०२९६
(स्रोत : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय)

रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांकडेच विद्यार्थ्यांचा नेहमी कल असतो. कौशल्य विकासाच्या योजनांमध्ये प्रमाणपत्रांच्या पलीकडे जात पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांचा विचार व्हायला हवा. आमच्या विद्यापीठात आम्ही तो केला आहे. कौशल्य अभ्यासक्रमात सुरुवातीपासूनच उद्योगांचा सहभाग घेत कार्यानुभवाची जोड देणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्यांचा ओढा कायम ठेवता येईल.
- डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ

केवळ प्रमाणपत्र मिळाले म्हणजे रोजगार मिळेल असे नाही. पदवी प्रमाणपत्राबरोबरच कौशल्य आणि कार्यानुभवाची जोड आवश्यक आहे. तेव्हाच रोजगाराची हमी देता येईल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमात कौशल्य आत्मसात करत असताना कार्यानुभवावर भर देणे गरजेचे आहे.
- डॉ. दीपक शिकारपूर, संगणकतज्ज्ञ

परिस्थिती प्रतिकूल असेल तर विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख, कमी कालावधीचे छोटे कोर्स केले पाहिजेत. अशा कोर्समध्ये थेट कौशल्य विकसन होणे अपेक्षित असते. स्वयंरोजगाराच्या संधी देणारे आणि संबंधित कार्यक्षेत्राशी कार्यानुभवाचा अनुभव देणारे अभ्यासक्रम आगामी काळात उपयुक्त ठरतील.
- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ