राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १ : यंदाच्या मॉन्सूनोत्तर हंगामात ऑक्टोबर महिन्यात देशात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मॉन्सून हंगाम (जून ते सप्टेंबर) संपला असून आता ऑक्टोबर ते डिसेंबर या मॉन्सूनोत्तर हंगामाला सुरवात झाली आहे. त्यानुसार हवामानशास्त्र विभागाने मॉन्सूनोत्तर हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा दक्षिण भारतात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. साधारणपणे या कालावधीत दक्षिण भारतात ३३४.१३ मिलिमीटर पाऊस नोंदला जातो तर यंदा सरासरी इतका अर्थात ८८ ते ११२ टक्के पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात दक्षिण भारतात सर्वाधिक पावसाची स्थिती असते. तर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचे दक्षिण भाग, कोकण तसेच विदर्भात सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाचा अंदाज आहे.
दीर्घकालीन अंदाजानुसार मॉन्सूनोत्तर हंगामाच्या काळात देशात सरासरीपेक्षा अधिक (११५ टक्के) पावसाची शक्यता वर्तविली आहे. या काळात उत्तरेकडील काही राज्यांसह वायव्य आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता, उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

परतीचा प्रवास थांबत-थांबत
मॉन्सूनच्या परतीचा प्रवास वायव्य भारतातून सुरू झाला असून वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सून बाहेर पडला आहे. २० सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. त्यानंतर परतीची सीमा ‘जैसे थे’च्या स्थितीत होती. तसेच २९ सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला पुन्हा चालना मिळाल्यानंतर आता पुन्हा हा प्रवास थांबला आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून मॉन्सूनच्या परतीची सीमा जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालियापर्यंत कायम आहे.