पुणे रेल्वे विभागात विना तिकीट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune railway
विना तिकीट फिरणाऱ्यांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई

पुणे रेल्वे विभागात विना तिकीट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पुणे - पुणे रेल्वे विभागात गेल्या सहा महिन्यांत विना तिकीट प्रवास करणाऱ्या १ लाख ७२ हजार ५७३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून १२ कोटी ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी तिकीट चेकिंग विभागाला १२ कोटी दंड वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ते सहा महिन्यांतच पूर्ण केले. यासाठी २६५ कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

पुणे रेल्वे विभागात सप्टेंबरमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २२ हजार १९४ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले, त्यांच्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा जास्त दंड वसूल करण्यात आला. तसेच ४,०५२ प्रवाशांकडून अनियमित प्रवासाच्या बदल्यात २३ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शिवाय साहित्य बुक न करता प्रवास करणाऱ्या ३०९ प्रवाशांकडूनही ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे विभागातील तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यंदाच्या वर्षी विक्रमी कारवाई केल्याने सहा महिन्यांतच वर्षाचे उद्दिष्ट गाठल्याने वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे व वाणिज्य विभागीय व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.