दिव्यांगांच्या निवासी शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांच्या निवासी शाळांची 
वर्षातून तीन वेळा तपासणी
दिव्यांगांच्या निवासी शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी

दिव्यांगांच्या निवासी शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या निवासी शाळांची आता वर्षातून किमान तीन वेळा तपासणी करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पहिली, डिसेंबर व जानेवारी महिन्यात दुसरी आणि फेब्रुवारी व मार्च महिन्यात तिसरी तपासणी करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ही तपासणी सामाजिक न्याय विभागामार्फत न करता शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
दिव्यांगांच्या विशेष शाळांमध्ये मूकबधिर, कर्णबधिर विद्यालये, मतिमंद निवासी शाळा, अंध मुला-मुलींची शाळा, बहुविकलांग मुलांच्या विशेष शाळा आदींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात विविध संवर्गातील दिव्यांगांच्या मिळून एकूण ७७ विशेष शाळा असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी सांगितले. आतापर्यंत या शाळांची सामाजिक न्याय विभागामार्फतच तपासणी केली जात असे. यापुढे मात्र शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी पथकांमार्फत ही तपासणी केली जाणार आहे.

तपासणीसाठी १४ निकष
प्रामुख्याने शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र, ऑनलाइन पद्धतीने मिळविलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रधारक प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी, आधारजोडणी, बायोमेट्रिक मशिनद्वारे तपासणीदिवशी मंजूर संख्येनुसार विद्यार्थ्यांची संख्या व यादी, मंजूर व मान्यताप्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची तपासणीच्या दिवशीची संख्या व यादी, सर्व मंजूर व मान्यताप्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि थेरपिस्ट यांच्या प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत व नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वास परिषदेकडे (आरसीआय) नूतनीकरणासाठी दिलेली कागदपत्रे व यादी प्रमुख निकषांसह विविध १४ निकषांच्या आधारे या शाळांचे मूल्यांकन केले जाणार आहे.