‘आयपीएस’ नवदुर्गेची गडकिल्ले भ्रमंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयपीएस’ नवदुर्गेची गडकिल्ले भ्रमंती
‘आयपीएस’ नवदुर्गेची गडकिल्ले भ्रमंती

‘आयपीएस’ नवदुर्गेची गडकिल्ले भ्रमंती

sakal_logo
By

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : ‘त्या’ आयपीएस अधिकारी आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने दैनंदिन कामे आणि त्याचा ताणही तितकाच मोठा. पण कितीही मोठे प्रकरण असो, त्याचा अखेरपर्यंत छडा लावण्याची, त्यांची खासियत... मात्र हे काम केल्यानंतर, त्या सुट्टीच्या दिवशी आपल्या दुर्गप्रेमी मित्र-मैत्रीणींसमवेत थेट गड, किल्ला गाठतात... भ्रमंती करतानाच, त्या-त्या गडाचा, किल्ल्यांचा इतिहास जाणून घेतात. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील असंख्य किल्ले त्यांनी सर केले. या नवदुर्गा आहेत पुणे पोलिस दलातील पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके.
भाग्यश्री नवटके, पुणे पोलिस दलातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. नवटके व त्यांच्या टीमने नुकतीच केलेली ‘लोन ॲप’ची देशपातळीवरील कारवाई सध्या चर्चेचा मुद्दा आहे. यापूर्वीही त्यांनी टिईटी, म्हाडा, आरोग्य भरती परीक्षा घोटाळा उघडकीस आणून राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. याबरोबरच क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन प्रकरण, बीएचआर बॅंक, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक घोटाळा असे असंख्य घोटाळे, अतिशय संवेदनशील प्रकरणे उघडकीस आणत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. अतिशय जोखमीचे काम करताना त्या आपला छंद जोपसण्यालाही प्राधान्य देतात.

जेथे नोकरीनिमित्त बदली होईल, त्या-त्या जिल्ह्यातील सर्व किल्ले त्यांनी पालथे घातले आहेत. सुट्टीच्या दिवशी पहाटे आपल्या २५-३० जणांच्या ‘आयपीएस’ ग्रुपने ठरविलेल्या ठिकाणी पोचतात. तिथून पुढे त्यांची दुर्गभ्रमंती सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पन्हाळा-पावनखिंड ट्रेक पूर्ण केला. नवटके यांनी आत्तापर्यंत, शिवनेरी, रायगड, राजगड, पुरंदर, सिंहगड, रोहिडेश्‍वर, विशाळगड, लोहगड, अंदरबन, विजयदुर्ग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण येथील किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. केवळ भ्रमंती नाही, तर त्या-त्या किल्ल्यांसंबंधीची इत्थंभूत माहितीही त्या घेतात.
एकदा तुम्ही दुर्गभ्रमंती करण्यास सुरुवात केली की, तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडण्यास सुरुवात होते, असे त्या सांगतात. ताणतणाव कमी झाल्याने पुढे कित्येक दिवस ताजेतवाने होऊन काम करता येत असल्याचे नवटके सांगतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे किल्ले फक्त जगण्यासाठी प्रेरणाच देत नाहीत, तर तुम्हाला निरोगी आरोग्य, सकारात्मक ऊर्जा, तणावमुक्ती आणि नवी दृष्टी देतात. आपल्याकडे इतके गड, किल्ले आहेत, मग तरुणांना नैराश्‍य येते कसे असा प्रश्‍न पडतो. एकदा या किल्ल्यांवर फिरा, वाचन करा, आत्महत्येचा विचार आपोआप दूर होईल.
भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.