काम सहाऐजवी दहा तारखेपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काम सहाऐजवी दहा तारखेपासून
काम सहाऐजवी दहा तारखेपासून

काम सहाऐजवी दहा तारखेपासून

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ४ : चांदणी चौकातील अतिरीक्त दोन लेनचे काम या आठवड्यात पूर्ण करायचे आणि त्यानंतरच पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू करावयाचे असा निर्णय महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे. त्यामुळे या पुलाचे काम आणखी चार दिवस पुढे गेले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. ७) महापालिका-पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिस यांची एकत्रित बैठक बोलविण्यात आली आहे.

का घेतला निर्णय?
चांदणी चौक येथील उड्डाणपूल रविवारी पहाटे पाडण्याचे आणि तो पडल्यानंतर पुढील आठ दिवसांत अतिरीक्त दोन लेनचे काम पूर्ण करण्याचा, तसेच पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सहा ऑक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय ‘पुमटा’च्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम रविवारी पहाटे पूर्ण करण्यात आले. तसेच पुलाचा राडारोडाही हटविण्यात आला; मात्र हा पूल पाडल्यानंतरही सोमवारी पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्याच वेळेस विद्यापीठ चौकातही वाहतुकीची कोंडी झाली. चांदणी चौकातील अतिरीक्त दोन लेनचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र हे काम पूर्ण होण्यास हा आठवडा लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, ‘‘पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू करण्याचे सर्व नियोजन ‘पीएमआरडीए’कडून पूर्ण करण्यात आले आहे. चांदणी चौकात पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून अतिरीक्त दोन लेनचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी ते पूर्ण होण्यास अद्याप काही दिवस लागणार आहे. याच कालवधीत विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू केले, तर दोन्ही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास होऊ शकतो. तसेच महापालिकेकडून युटीलिटी शिफ्ट करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. तेथेही डांबरीकरणाचे काम राहिले आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर काम सुरू केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे सहा ऑक्टोबरऐवजी हे काम दहा ऑक्टोबरपासून सुरू करावे, अशी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचना केली आहे. तसे केल्यास चांदणी चौकातील अतिरीक्त दोन लेनचे काम पूर्ण होऊन तेथील वाहतूक सुरळीत होईल आणि विद्यापीठ चौकावरही ताण कमी हाईल.’’

यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिस यांची एकत्रित बैठक बोलविण्यात आली आहे. हे बैठक सकाळी साडेदहा वाजता होणार असून त्यामध्ये चौकात उड्डाणपूलाचे काम कधी सुरू करावे, यावर एकमत करून निर्णय घेण्यात येणार आहे.
- विवेक खरवडकर, मुख्य अभियंत, पीएमआरडीए