पुण्यात दोन दिवस हलक्या सरींची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात दोन दिवस हलक्या सरींची शक्यता
पुण्यात दोन दिवस हलक्या सरींची शक्यता

पुण्यात दोन दिवस हलक्या सरींची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः गेल्या तीन दिवसांपासून शहरात विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (ता. ४) पुन्हा हजेरी लावली. शहरात दसऱ्याच्या पूर्व संध्येला अवघ्या तासाभरात ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान पुढील दोन दिवस शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाचा व पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी पुणेकरांना पावसाची अनुभूती होण्याची शक्यता आहे.

शहरात तीन दिवसांपासून आकाश सामान्यतः निरभ्र असल्याने उन्हाचा चटका काहीसा जाणवू लागला होता. त्यात उकाडाही जाणवत होता. दरम्यान मंगळवारी दिवसभर ऊन कायम होते. मात्र दुपारनंतर शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्‍यम सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा पसरला होता. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणासह दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी झालेल्या पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)
पुणे शहर ः ८.६
पाषाण ः ३.६
लवळे ः ३९
चिंचवड ः १२

विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता
राज्यात बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. दरम्यान पावसासाठी हवामान पोषक होत असल्याने बुधवारी (ता. ५) मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. बुधवारी (ता. ५) हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्‍ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.