पुणे शहर, उपनगरांत वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर, उपनगरांत वाहतूक कोंडी
पुणे शहर, उपनगरांत वाहतूक कोंडी

पुणे शहर, उपनगरांत वाहतूक कोंडी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः मंगळवारी सायंकाळी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहने बाणेर, औंध, खडकी मार्गे शहरात आल्याने वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली. त्यामुळे वाहनचालकांवर एक ते दीड तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटे झालेल्या या पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक संथ झाली. त्यातच सिग्नल यंत्रणाही बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा वाहनचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. मुंबईहून निघालेली व सायंकाळी वाकड, बालेवाडीपर्यंत येणारी वाहने थेट चांदणी चौकाकडे जाण्याऐवजी औंध, बाणेर, खडकी मार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा जुना मुंबई पुणे महामार्गावरून वाकडेवाडी येथून शिवाजीनगर मार्गे सातारा, सोलापुरच्या दिशेने जाऊ लागले आहेत. त्यामुळे औंध ते विद्यापीठ, बाणेर ते विद्यापीठ व शिवाजीनगर ते गणेशखिंड रस्ता या रस्त्यावर सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कृषी महाविद्यालयापर्यंत पोचली होती. परिणामी गणेशखिंड रस्त्याला मिळणारे फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, मॉडेल कॉलनी परिसरामध्येही वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यानेही वाहतूक कोंडी झाली होती. नवरात्र सणामुळे चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने सेनापती बापट रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली होती. याबरोबरच विधी महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा या ठिकाणीही वाहतूक कोंडी झाली होती.

मी मंगळवारी सायंकाळी सात वाजता औंधवरून पुणे स्टेशनला निघालो होतो. एरवी अर्ध्या तासामध्ये मी पुणे स्टेशनला पोचतो. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने मला पुणे स्टेशनला पोचण्यासाठी दीड तास ळ लागला.- कौस्तुभ साळवी, नोकरदार.