आधारकार्ड अद्ययावतसाठी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधारकार्ड 
अद्ययावतसाठी
मोहीम
आधारकार्ड अद्ययावतसाठी मोहीम

आधारकार्ड अद्ययावतसाठी मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : तुमच्या आधार कार्डला दहा वर्षे झाली असतील तर आधार केंद्रात जाऊन ते अद्ययावत करावे लागणार आहे. पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच, त्यात बदल झाला नसला तरी पडताळणीसाठी सध्याचा पत्ता आधार केंद्रात द्यावा लागणार आहे. ही बाब ऐच्छिक आहे. परंतु आधार कार्ड अद्ययावत झाल्यास संबंधित व्यक्ती त्याच पत्त्यावर राहत असल्याचे स्पष्ट होणार आहे. शिवाय, बॅंक खात्यासह आणि सरकारी अनुदान योजनांसाठी इ-केवायसी करणे सोपे जाणार आहे.
देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधारकार्ड हा विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा समजला जातो. आधार केंद्रांवर नवीन आधार काढण्यासह कार्डावरील छायाचित्र, पत्ता, नावातील बदल करण्याचे काम केले जाते. मोबाईल क्रमांक आधारकार्डला लिंक करणे, तर, आधारकार्ड हे पॅन कार्ड आणि बॅंक खात्याशीही लिंक करणे आवश्यक आहे. यासोबतच आता आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना ते अद्ययावत करून घेण्याबाबत मोहीम सुरू करण्यात आली आहे.

आधार कार्डचे फायदे
देशातील वास्तव्याचा पुरावा. विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना आधारकार्ड आवश्यक. बॅंक खाते, गॅस जोडणी, गृहकर्ज, वैयक्तिक कर्जासाठी आधार हा पत्त्याचा ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. अटल पेन्शन योजना, प्राप्तीकर अर्ज, शालेय-महाविद्यालयीन प्रवेश शुल्क अनुदान, रेशनवर धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकाधारक, शेतकऱ्यांसह विविध लाभार्थ्यांना सरकारी योजनेंतर्गत अनुदान थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार आवश्यक.

नवीन आधार कार्डसाठी कागदपत्र
नवीन आधार कार्ड काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. अर्जदाराचा पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, चालक परवाना यापैकी एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. वयाच्या पाच वर्षांपर्यंत जन्म प्रमाणपत्र. शालेय विद्यार्थ्यांसाठी बोनाफाइड. तसेच, कोणतीही कागदपत्रे नसल्यास ‘ॲनेक्झर ए’ अर्जाची सुविधा.

आधार कार्डसाठी पोर्टल
https://www.uidai.gov.in/

हे लक्षात ठेवा
- पोर्टलवर नजीकच्या स्थायी आधार नोंदणी केंद्र, बॅंक, टपाल कार्यालयाची माहिती
- आधारकार्डमध्ये बदल करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसई) उपलब्ध
- नवीन आधार कार्ड, मोबाईल लिंक, छायाचित्र बदलताना नोंदणी केंद्रावर जाणे आवश्यक
- आधारकार्ड हरविल्यास आधार क्रमांकावरून ऑनलाइन डाऊनलोड करता येते.
- पीव्हीसी आधार कार्डसाठी ५० रुपये शुल्क
- तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक ः १९४७

आधार कार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झाल्यास आधार केंद्रातून ते अद्ययावत करून घ्यावे. राज्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत केंद्रचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आधार कार्डमध्ये बदल करताना रीतसर शासकीय पावतीपेक्षा अधिक शुल्क आकारल्यास संबंधितांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करावी.
- रोहिणी आखाडे- फडतरे, जिल्हा नोडल अधिकारी (आधार)