केशरी शिधापत्रिकाधारक दिवाळी फराळापासून दूरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशरी शिधापत्रिकाधारक दिवाळी फराळापासून दूरच
केशरी शिधापत्रिकाधारक दिवाळी फराळापासून दूरच

केशरी शिधापत्रिकाधारक दिवाळी फराळापासून दूरच

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : ‘‘सध्या महागाई वाढली आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. सरकारने रेशनवर किमान दिवाळीत रवा, चणाडाळ, तेल, साखर द्यायला हवे होते. थोडा आधार झाला असता. सरकारचेही आमच्याकडे लक्ष आहे, असे वाटले असते. परंतु रेशन कार्ड काढून काही उपयोग आहे की नाही, असे वाटायला लागले आहे. दिवाळीचा सण तर साजरा करावा लागेल, त्यासाठी काही तरी करून, पैशांची व्यवस्था करावी लागेल,’’ ही प्रतिक्रिया आहे केशरी कार्डधारक असलेले फूल व्यावसायिक विजय कोठावळे यांची.
रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना सध्या केवळ गहू आणि तांदूळच दिला जातो. काही वर्षांपासून दिवाळीत रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेलही बंद केले होते. यंदाच्या दिवाळीत सरकारने शंभर रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिवाळी गोड होणार असे वाटले होते, परंतु ही योजना केवळ अंत्योदय (पिवळे रेशनकार्ड), अन्नसुरक्षा योजनेतील म्हणजे प्राधान्यक्रम कुटुंबातील (केशरी कार्ड परंतु धान्य मिळण्याचा शिक्का) शिधापत्रिकाधारकांसाठी आहे. उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे साडेदहा लाख इतकी आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय योजनेतील आठ हजार आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील तीन लाख शिधापत्रिकाधारकांनाच मिळणार आहे. त्यामुळे केशरी शिधापत्रिका असलेल्या उर्वरित सव्वासात लाख कुटुंबांना दिवाळीच्या फराळ योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

दिवाळीत पामतेल, साखर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, ही चांगली बाब आहे. परंतु केशरी कार्डधारकांनाही किमान दिवाळीत या योजनेचा लाभ मिळायला हवा होता. अन्नधान्य वितरण विभागाने शहरासाठी कोरेगाव पार्क ‘एफसीआय’कडूनच माल उचलावा. तरच शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी वेळेत वितरण शक्य होणार आहे.
- गणेश डांगी, अध्यक्ष- रेशन दुकानदार संघटना पुणे

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती
रेशन दुकाने : ७७०
अंत्योदय योजना शिधापत्रिका संख्या : ८ हजार ४१८
लाभार्थी : ३७ हजार २३१

प्राधान्यक्रम कुटुंब (अन्नसुरक्षा) योजना
शिधापत्रिकाधारक कुटुंब : ३ लाख १ हजार ८८६
लाभार्थी : १२ लाख ४३ हजार १४८

केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब :
७ लाख २४ हजार २९५
लाभार्थी : ३० लाख २७ हजार १६७