अयोध्येत रंगणार पुण्यातील कलाकारांचे गीतरामायण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अयोध्येत रंगणार पुण्यातील कलाकारांचे गीतरामायण
अयोध्येत रंगणार पुण्यातील कलाकारांचे गीतरामायण

अयोध्येत रंगणार पुण्यातील कलाकारांचे गीतरामायण

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : भारत विकास परिषदेच्या पुणे शाखेतर्फे हिंदी गीतरामायणाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. १२) सायंकाळी ५ ते ८ दरम्यान अयोध्या येथे करण्यात आले आहे. सध्या विराजमान असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीसमोर सर्व कलाकारांना गीत रामायणातील दोन गीते प्रस्तुत करण्याची संधी मिळणार आहे, हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपतराय यांनी अयोध्येत राममंदिराचे ४० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. २०२३ मधील रामनवमीच्या पूर्वी रामलल्लाच्या मूळ मूर्तीची प्रतिष्ठापना मुख्य गाभाऱ्यामध्ये करण्यात येणार आहे. येत्या १० ऑक्टोबरपासून उत्तरप्रदेशात कल्पवासी पर्व सुरू होत आहे. याच ठिकाणी ११ ते १३ ऑक्टोबर यादरम्यान एक क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत विकास परिषदेच्या पुणे शाखेने अयोध्येतील कारसेवकपूरम येथे १२ ऑक्टोबर रोजी हिंदी गीतरामायणाचे सादरीकरण करण्याचे ठरविले आहे. चंपतराय यांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे.
या कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित केले आहे. पुण्यात परिषदेतर्फे दरवर्षी रामनवमी निमित्त गीतरामायण सादर करणारे सर्व कलाकार हा कार्यक्रम अयोध्येत सादर करतील. त्यात गायक दत्ता चितळे, तुषार रिठे, प्रार्थना साठे, अमिता घुगरी यांचा समावेश असून, वाद्यवृंदांमध्ये अमित कुंटे, उद्धव कुंभार, दीप्ती कुलकर्णी, अनय गाडगीळ यांचा समावेश आहे. तर निवेदन अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत.