जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून
जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून

जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः स्वारगेट येथे प्रवाशांची वाट पाहत थांबल्यानंतर रात्रीच्यावेळी किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणानंतर तिघांनी एका रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करून, त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास जनता वसाहतीमधील सिमेंट कॅनॉल रस्ता येथे घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली.

विनोद आल्हाट, अनिकेत नांगरे, आकाश देवरुखे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर अक्षय हनुमंत रावडे (वय २६, रा. रायकरनगर, वडगाव धायरी) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षयचा भाऊ किरण (वय २७) याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय रिक्षा चालक असून संशयित आरोपी त्याचे मित्र होते. त्यापैकी विनोद आल्हाट हा देखील रिक्षाचालक आहे. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास ते स्वारगेट परिसरामध्ये प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी त्यांची भांडणे झालेला एक तरुण कारागृहातून बाहेर येणार असल्याची चर्चा त्यांच्यात सुरु होती. त्यावेळी त्यावरुन अक्षयचे अन्य तिघांशी वाद झाले. अक्षयने त्यांना ‘तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही. तुमच्यात दम नाही’ असे म्हटले. त्याचा राग आल्याने तिघांनी त्यास गाडीवर बसवून जनता वसाहतीमधील सिमेंट कॅनॉल परिसरात नेले. तेथे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून, त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह तेथील झुडपामध्ये टाकून दिला. दरम्यान, शनिवारी सकाळी काही नागरीकांनी मृतदेह पाहिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेऊन आरोपींना काही वेळातच बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज पाटील करत आहेत.
--------------