समितीच्या संस्कारांमध्ये यशाची बीजे डॉ. संगीत बर्वे यांची भावना; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समितीच्या संस्कारांमध्ये यशाची बीजे 
डॉ. संगीत बर्वे यांची भावना; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे सत्कार
समितीच्या संस्कारांमध्ये यशाची बीजे डॉ. संगीत बर्वे यांची भावना; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे सत्कार

समितीच्या संस्कारांमध्ये यशाची बीजे डॉ. संगीत बर्वे यांची भावना; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः विद्यार्थी सहायक समितीने मला खऱ्या अर्थाने घडवले. येथे लागलेली शिस्त, आपली कामे आपण करायची सवय याचा आयुष्यात खूप उपयोग झाला. त्या सवयींमुळेच मी वैद्यकीय व्यवसाय, लेखन, संसार अशा सर्व आघाड्यांवरची सर्कस सहजपणे करू शकले. त्यामुळे माझ्या यशाची बीजे समितीच्या या संस्कारांमध्ये आहेत, असे मत ज्येष्ठ कवयित्री व बालसाहित्यिकार डॉ. संगीता बर्वे यांनी शनिवारी व्यक्त केले.

विद्यार्थी सहायक समितीतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते समितीच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. बर्वे यांचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या माजी विद्यार्थिनी व लेखिका प्रार्थना सदावर्ते यांनी डॉ. बर्वे यांची मुलाखत घेतली. याप्रसंगी प्रा. तेज निवळीकर, डॉ. राजीव बर्वे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव सुनील चोरे, मनीषा गोसावी, अनिता देशपांडे, डॉ. मानसी अंबीकर, सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागातून आल्याने परिस्थितीची जाण होती. वडिलांचे संस्कार होते. पुढे समितीत आल्यावर आयुष्याचा अर्थ उमगत गेला. मी ठरवून लिखाणाकडे वळले नाही. सहज सुचले, ते लिहीत गेले. आजच्या टेक्नोसॅव्ही जगात मुलांना समृद्ध बनविण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांना समजून घेतले पाहिजे. ‘पियूची वही’ ही प्रत्येकाच्या आयुष्याला जोडणारी आहे.’’

भाऊसाहेब जाधव म्हणाले, ‘‘डॉ. संगीता बर्वे यांना मिळालेला पुरस्कार हा समितीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सहज, तरल व वास्तवदर्शी लेखनातून बर्वे यांनी मुलांचे भावविश्व मांडले आहे. ‘पियूची वही’ ही संस्कार देणारी साहित्यकृती आहे. लहान मुलांनीच नव्हे, समाजातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे.’’
----------
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यापासून अनेक सत्कार, कौतुक झाले. मात्र, ज्या विद्यार्थी साहाय्यक समितीने मला घडवले, त्या मातृसंस्थेने आज केलेला सत्कार भारावणारा आहे. माझ्या सख्या, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाने पाठीवर टाकलेली ही कौतुकाची थाप ऊर्जा देणारी आहे.
- डॉ. संगीता बर्वे
फोटोः 97919