रिल्स बनले उत्पन्नाचे साधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिल्स बनले उत्पन्नाचे साधन
रिल्स बनले उत्पन्नाचे साधन

रिल्स बनले उत्पन्नाचे साधन

sakal_logo
By

अक्षता पवार ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १२ ः सोशल मीडिया हा आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात मनोरंजनाचा पहिला पर्याय ठरत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबसह इतर विविध ॲप्समध्ये नेटकरी मंडळी गुंतली आहेत. त्यात सोशल मीडियावर सर्वाधिक जास्त प्राधान्य दिले जाते ते म्हणजेच, रिल्स किंवा शॉर्ट व्हिडिओला. इन्स्टाग्राम किंवा फेसबुक रिल्स स्क्रोलिंग करता-करता तुम्ही देखील त्यावर तासनतास घालवता का? पण त्यातून उत्पन्न मिळत असेल तर? होय! अशा या काही सेकंदाच्या व्हिडिओद्वारे आज कित्येकांना उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
कोरोनाकाळात सोशल मीडियाच्या वापरात झपाट्याने वाढ झाली. यात सर्वाधिक टिकटॉक या प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचे निदर्शनास आले. परंतु देशात टिकटॉकसह विविध ॲप्लिकेशन बंद करण्यात आले. त्यामुळे टिकटॉकवर लाखोंच्या संख्येने असलेल्या फॉलोव्हर्स असलेल्या टिकटॉक स्टार्सने आता इन्स्टाग्राम, मौज, युट्यूबसह इतर ॲप निवडण्यास प्राधान्य दिले आहे. तर हे वापरकर्ते १५, ३० किंवा ६० सेकंदाची रिल्स अथवा युट्यूब शॉर्ट्स (लहान व्हिडिओ) तयार करत आपली लोकप्रियता वाढविण्यावर भर देत आहेत. महत्त्वाचे म्हणजेच रिल्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून काही हजारांपासून ते लाखांपर्यंत पैसे कमविण्याचे संधी उपलब्ध होते.

या गोष्टींचा केला जातो विचार
- व्हिडिओ किंवा रिल्समध्ये नावीन्यता
- काही सेकंदांच्या व्हिडिओद्वारे सामाजिक संदेश देणे व समाजातील वस्तुस्थिती मांडणे
- व्हिडिओ किंवा रिल्ससाठी व्हिव्यूज व लाईक्स वाढविण्यावर भर
- रिल्स ट्रेंडिंग आणि इंटरनेटवर व्हायरल कसे करता येतील

फॉलोव्हर्स, व्हिव्यूज व लाइक्सचा फायदा
सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोव्हर्स आणि व्हिव्यूज मिळत असल्याने त्या व्यक्तीला (अकाउंट होल्डर) पैसे कमविण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतात. त्यांना आपल्या रिल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती, वेब सिरिज, चित्रपट आदींचे प्रमोशन करण्याची संधी मिळते. रिल्स आणि शॉर्ट्सच्‍या माध्यमातून त्यांना पैसे कमाविण्याची संधी मिळत आहे.

सोशल मीडिया ‘मीट अप्स’चे आयोजन
अलीकडे सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूब शॉर्ट्स ‘मीट अप’ हा प्रकार अनेकांना ऐकायला मिळत असेल. अशा प्रकारच्या ‘मीट अप्स’च्या माध्यमातून देशातील प्रसिद्ध सोशल मीडिया वापरकर्ते, तसेच नव्याने या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत असलेल्यांना एकत्रित आणत त्यांना प्रोत्साहित करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

सोशल मीडियाचा वापर आपण उत्पन्नासाठी करू शकतो हे समजताच मी यावर काम करायला सुरू केले. वेगवेगळ्या विषयांवर ३० ते ६० सेकंदाचे व्हिडिओ तयार करत गेलो. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत गेला आणि फॉलोव्हर्स वाढत गेले. त्यामुळे इन्स्‍टाग्रामवर दोन अकाउंट तयार केले. यामाध्यमातून मला महिन्याला ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा हे जर जाणून घेतले तर नक्कीच या माध्यमातून उत्पन्न मिळू शकते.
- पद्मसिंह पाटील,
सोशल मीडिया वापरकर्ता