मुलगी होऊ द्या हो!!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलगी होऊ द्या हो!!!
मुलगी होऊ द्या हो!!!

मुलगी होऊ द्या हो!!!

sakal_logo
By

मुलगी होऊ द्या हो !!!

घरातील कामं निमूटपणे करत, नवरा आणि सासर यांच्या मर्जीप्रमाणे लागेल तेव्हा गरजेप्रमाणे मुलांना जन्म देणारी मशिन अशी स्त्रीची व्याख्या आजही आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेली आहे. भारतीय समाजातील ८० टक्के स्त्रिया आजही या मानसिकतेचा सामना करत आहेत. त्याचबरोबर तथाकथित उच्चभ्रू, शिक्षित समाजातही ‘मुलगा हवाच’ ही मानसिकता अजून गेलेली नाही.
माझी एक पेशंट आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणारी होती. तिला एक गोंडस मुलगी होती. तिच्यावेळीच गर्भारपण आणि बाळंतपण अवघड झालं होतं. आता यापुढे प्रेग्नन्सीचा विचार करू नको, असं मी तिला बजावून सांगितलं होतं पण याही मुलीला सासरच्या लोकांचा मुलाचा हट्ट नाकारता आला नाही. या लोकांनी तिला एकदा नाही तर दोन वेळा प्रेग्नन्सी प्लॅन करायला लावली. दुर्दैवाने दोन्ही वेळा अबोरशन झालं. अतोनात हाल झाले बिचारीचे. नवरा तेवढाच उच्चशिक्षित असूनही काही बोलला नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय?

‘आता असं काही नाही हो राहिलं. मुलगा- मुलगी सगळे सारखेच..ते सगळं पूर्वी असायचं.’ अशा गोड गैरसमजुतीत आपल्यापैकी बरेच जण असतात पण वास्तव वेगळेच आहे. इतकंच काय, स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली माझ्या ओळखीतील मुलीला दुसरी मुलगी झाल्यावर रडताना मी बघितली आहे. उच्चभ्रू आणि पैसेवाल्या समाजात परदेशी जाऊन मुलगा- मुलगी तपासून येणारेही महाभाग आहेत कारण आपल्या देशात याबाबतीतला कायदा खूप कडक आहे.
पुण्यासारख्या सामाजिक दृष्टया विकसित शहराच्या थोडंसं बाहेर गेलं तर जे विदारक चित्र अजूनही दिसतंय. पुण्याच्या अगदी जवळच्या शहरात माझी मैत्रीण भूलतज्ज्ञ म्हणून काम करते. तिच्याकडूनही काही भयकथा ऐकायला मिळतात. १२-२४ तास कळा देऊन, पूर्णपणे गलितगात्र झालेली पेशंट जेव्हा मुलीला जन्म देते. तेव्हा बाहेर जमलेले नातेवाईक अक्षरशः कोणीतरी मेल्यासारखा आक्रोश करतात आणि मग निघून जातात. बाळाचं तोंड ही न बघता. त्यानंतर त्या बिचाऱ्या बाळंतिणीला खायलाही काही आणून दिलं जात नाही.

जन्मापासूनच स्त्रीवरील अन्यायाला सुरवात होते. वेळेआधी झालेलं बाळंतपण, जुळ्यांमध्ये एक मुलगी असेल तर किंवा जन्मतः काही समस्या आली आणि बाळाला अतिदक्षता विभागात ॲडमिट करण्याची वेळ आली तर मुलगा असेल तर वाट्टेल तेवढी पळापळ आणि खर्च करायला नातेवाईक तयार असतात पण मुलगी असेल तर सर्रास टाळाटाळ केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात हे चित्र आम्ही रोजच बघतो.
गेल्याच आठवड्यात माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या मैत्रिणीने एका ३८ वर्षाच्या स्त्रीची सहावी डिलिव्हरी केली. पहिल्या पाच मुली आहेत. प्रत्येक तपासणीला आल्यावर ही बिचारी ढसाढसा रडायची आणि ‘कैसे भी करो, लडका चाहिए’ एवढंच बोलायची. या अखंड टांगत्या तलवारीमुळे तिची तब्येतही सुधारत नव्हती. शेवटी तर हॉस्पिटलमधील सगळेच जण तिच्याकरता प्रार्थना करायला लागले आणि झाला शेवटी मुलगा. सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
या बाबत खूप मोठा जनजागर होणं गरजेचं आहे. फक्त कायदा करून खूप काही बदल होत नाहीत. लोक कायद्यातून पळवाटा काढतातच.
सरकारने पोलिओ निर्मूलन, तंबाखू व्यसनमुक्ती आदी योजना प्रभावीपणे राबवल्या. तशीच जनजागृती याबाबत करायला लागणार आहे. सतत लोकांच्या मनावर हा मुद्दा ठसवायला हवा. याला वेळ लागेल पण तरीही हार न मानता प्रयत्न चालू ठेवायला हवेत.
येणाऱ्या काळात आपल्याला निरोगी समाजजीवन हवं असेल तर आतापासून या मोहिमेला जोरदार सुरवात करायला हवी..मोहिमेचं नाव??
‘मुलगी होऊ द्या हो!!!’

डॉ. शिल्पा चिटणीस- जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ, कोथरूड, पुणे