हरकती-सूचनांची सुनावणी अंतिम टप्प्यात ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा ः ग्रामीण भागाची सुनावणी समाप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकती-सूचनांची सुनावणी अंतिम टप्प्यात 
‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा ः ग्रामीण भागाची सुनावणी समाप्त
हरकती-सूचनांची सुनावणी अंतिम टप्प्यात ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा ः ग्रामीण भागाची सुनावणी समाप्त

हरकती-सूचनांची सुनावणी अंतिम टप्प्यात ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा ः ग्रामीण भागाची सुनावणी समाप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १२ : सुमारे सात हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावरील हरकती-सूचनांची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या आराखड्यातील हद्दीतील ग्रामीण भागांची सुनावणी गुरुवारी समाप्त होत असून, त्यानंतर हद्दीतील संस्थात्मक आणि लोकप्रतिनिधींच्या हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या सुरवातीला हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा ताण कमी करण्यासाठी प्राधिकरणाने दोन ऑगस्ट २०२१ मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यात पुणे जिल्ह्याच्या एकूण भागापैकी सुमारे ६० टक्के भाग समावेश आहे तर ८१४ गावांचा समावेश आहे. या आराखड्याच्या माध्यमातून हद्दीत १८ अर्बन ग्रोथ सेंटरच्या (नागरिक विकास केंद्र) माध्यमातून २३३ गावांच्या विकासाचे मॉडेल तयार करण्यात करण्यात आले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून १ हजार ६३८ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे तर उर्वरित ग्रामीण भागासाठी ८ ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. एका ग्रोथ सेंटरमध्ये किमान ५ ते २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रारूप आराखड्यावर सुमारे ६७ हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली. दोन मार्चपासून समितीने सुनावणी घेण्यास सुरवात केली. गेल्या आठ महिन्यांपासून हरकतींवर सुनावणी सुरू आहे. ग्रोथ सेंटरमधील गावांच्या सुनावणीनंतर ग्रामीण भागातील गावांची सुनावणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. ग्रामीण भागातील सुनावणीचे काम उद्या संपुष्टात येणार आहे. त्यानंतर संस्थात्मक आणि लोकप्रतिनिधींची सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे विकास आराखड्यावरील सुनावणीचे दोन महत्त्वपूर्ण टप्पे पूर्ण झाले आहेत.
यासंदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल म्हणाले,‘‘ दोन टप्प्यातील सुनावणी पूर्ण झाली आहे. संस्थात्मक सुनावणी पूर्ण झाल्यानंतर समिती आपला अभिप्रायासह पीएमआरडीएला विकास आराखडा सादर करेल, त्यानंतर तो आराखडा राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. त्यास अद्यापही किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल.’’
-------------------

ग्रोथ सेंटरचे नाव आणि त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे ः
चाकण - २४, आळंदी - १३, वाघोली - १०, लोणी काळभोर - ११, खडकवासला - १३, पिरंगुट - १३, हिंजवडी - २३, तळेगाव - ३७ , मळवली - १९ , खेड राजगुरुनगर - १२, शिक्रापूर - ६, उरुळी कांचन - ९, खेड शिवापूर - ८, रांजणगाव - ४, सासवड - १२,केडगाव- ५, नसरापूर - १२, यवत - २
----------
इन्फोबॉक्स
स्वतंत्र विकास योजना
उर्वरीत ग्रामीण भागासाठी ८ ग्रोथ सेंटर प्रस्तावित केले आहेत. यामध्ये पाबळ, न्हावरे, राहू, किकवी, सांगरुण, पौड, कडुस आणि काले या गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्वतंत्र विकास योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शेती, वन, वनीकरण, हिल टॉप हिल स्लोप, पर्यटन, ग्रीन बेल्ट वापर विभाग व रस्त्यांचे जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे.
.............
इन्फोबॉक्स
हद्दीबाबत देशात तिसरी

बंगलोर आणि हैदाबादनंतर देशात तीन नंबरची सर्वात मोठी हद्द पीएमआरडीएची झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी हद्द ही पीएमआरडीएची आहे. या हद्दीतून जाणारे सहा महामार्ग. दोन रेल्वे, लोहगाव विमानतळ आणि एक नियोजित पुरंदर येथील विमानतळ, यांच्यासह पश्‍चिम घाट यांचाही विचार विकास आराखड्यात करण्यात आला आहे.

-------