Weather Update : पुण्यात आज पावसाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update pune
पुण्यात हलक्या पावसाचा अंदाज

Weather Update : पुण्यात आज पावसाचा अंदाज

पुणे : पुणे शहर आणि परिसरात पडत असलेल्या मध्‍यम सरींनी बुधवारी (ता. १२) काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारनंतर मात्र तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. शहरात ऊन-सावलीचा खेळ पुढील दोन दिवस असाच कायम राहण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी (ता. १२) दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात बुधवारी २८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांनी घट झाली होती.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

राज्यात जोरदार सरी
राज्यात मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावत आहेत. गुरुवारी (ता. १३) राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यासह कोकणातील उत्तर भागात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. सध्या मध्य भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून केरळ, कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ ते मध्य प्रदेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. उत्तर पंजाब आणि लगतच्या परिसरावर मात्र चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. यामुळे राज्यात आता पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे आहेत.

येथे येलो अलर्ट
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बुलडाणा, अकोला, गोंदिया, वाशीम, अमरावती, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ.