पुरंदर विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीत
पुरंदर विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीत

पुरंदर विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १२ : पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची अधिसूचना दिवाळीच्या आसपास प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातील जुन्याच जागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या विमानतळासाठीची भूसंपादन प्रक्रिया महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) ऐवजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मध्यंतरी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. राज्य सरकारच्या सूचनेनुसार राव यांनी एमएडीसी आणि जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत प्रकल्पाबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील एमआयडीसीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएडीसी आणि जिल्हा प्रशासनाने प्रकल्पाशी निगडित सर्व तपशील एमआयडीसीकडे सादर केला. त्यानुसार एमआयडीसीकडून विमानतळाच्या भूसंपादनाबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही अधिसूचना दिवाळीच्या आसपास म्हणजे पुढील १५ दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

नियोजित आंतराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरमधील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजेवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील २८३२ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. आता भूसंपादनासोबतच मोबदल्याची रक्कम लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानतळासोबतच बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवणूक केंद्र (मल्टिमोडल लॉजिस्टिक हब) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरी उड्डाणांसोबतच आयात-निर्यातीला चालना आणि लाखो रोजगार निर्माण होणार आहेत.

पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील एमआयडीसीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दिवाळीच्या आसपास प्रकल्पासाठीची भूसंपादन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी