चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्येप्रकरणी महिला वकीलावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्येप्रकरणी महिला वकीलावर गुन्हा
चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्येप्रकरणी महिला वकीलावर गुन्हा

चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्येप्रकरणी महिला वकीलावर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : विभक्त झालेल्या सुनेने नातीस भेटण्यास नकार देत धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याने आजोबांनी घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. याबाबत न्यायाधीश मुलाने घटस्फोट घेऊन विभक्त झालेल्या वकील पत्नीसह सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दिल्याने चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव सरोदिया असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा न्यायाधीश संदीप नामदेव सरोदिया (वय ५२, रा. बाणेर, पुणे) यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची विभक्त पत्नी ॲड. शालिनी ऊर्फ शिवानी, सासू मनीलता शर्मा व मेव्हणा शेखर शर्मा ( तिघे रा. बाणेर, पुणे) यांच्या विरोधात कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ३४ ( सामार्इक इरादा) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना तीन मार्च २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ यादरम्यान घडलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादाच्या कारणावरून संदीप सरोदीया व शालिनी यांच्यात घटस्फोट झाला आहे. नामदेव सरोदिया हे नातीला भेटण्यासाठी विभक्त झालेल्या सुनेच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांना मुलाच्या सासरच्या व्यक्तींनी धक्काबुक्की करून नातीला भेटू न देताच घराबाहेर काढले होते. या घटनेचा मनावर आघात झाल्याने त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवत बाणेर येथील सुशिल्प अपार्टमेंट येथून राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. मृत्युपूर्व लिहलेल्या चिठ्ठीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच तक्रारदार न्यायाधीशांच्या आईवर दुर्धर आजाराचे उपचार सुरु असल्याने उशिराने गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. गायकवाड पुढील तपास करत आहे.