‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ
‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ

‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा सुरू करून घेण्यासाठीच्या ‘विलासराव देशमुख अभय योजने’स ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करून घेण्याची संधी मिळणार आहे.

योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्त्याने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येतो. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत होता. मात्र, ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

एकरकमी थकबाकी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाब वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हप्त्याने पैसे भरण्यास इच्छुक ग्राहकांना पहिला हप्ता हा मूळ थकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ७ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. तर उर्वरित रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर किंवा त्यापूर्वी मंजूर केले आहेत, त्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्याला कोणतेही लाभ दिला जाणार नाहीत. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ठळक मुद्दे
- योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
- घरगुती ग्राहकांसह, व्यावसायिक,
उद्योजकांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची संधी