जागा ४४८; उमेदवार ६७ हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागा ४४८; उमेदवार ६७ हजार
जागा ४४८; उमेदवार ६७ हजार

जागा ४४८; उमेदवार ६७ हजार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः पुणे महापालिकेच्या रिक्त ४४८ जागांसाठी घेण्यात आलेली ऑनलाइन परीक्षा नोंदणीकृत ८६ हजार ९९४ उमेदवारांपैकी ६७ हजार २५४ जणांनी दिली. एकूण पदे व परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता बेरोजगारीची समस्या किती तीव्र झाली आहे, हे स्पष्ट होते.
कनिष्ठ अभियंच्या (स्थापत्य) एका पदासाठी सुमारे ९४, कनिष्ठ अभियंत्याच्या (यांत्रिकी) एका जागेसाठी २९३, लिपिकच्या एका जागेसाठी २५० तर सहाय्यक विधी अधिकाऱ्याच्या एका जागेसाठी तब्बल १२४ उमेदवार असल्याचे परीक्षेवरून स्पष्ट झाले.
एनडीएमधील केंद्रावर एका उमेदवाराला मोबाईलचा वापर करून कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. अनेक केंद्रांवर उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह झेरॉक्स कॉपी न आणल्याने काहींना परीक्षेला मुकावे लागले.
राज्य सरकारने गेल्यावर्षी पदभरती करण्यास मान्यता दिल्यानंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात आवश्‍यक असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. पुणे जिल्ह्यात दोन्ही पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०८ आहे. यासाठीची ऑनलाइन परीक्षा ‘आयबीपीएस’कडून घेण्याचा निर्णय घेतला. या सर्वपदासांठी महापालिकेकडे एकूण ८६ हजार ९९४ अर्ज आले होते. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे लिपिक पदासाठी आलेले आहेत. राज्यातील सुमारे १५ शहरात परीक्षा घेण्यात आल्या. संपूर्ण परीक्षेत सरासरी ७७.३० टक्के उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली, अशी माहिती महापालिकेने दिली.
परीक्षेमध्ये बोगस उमेदवार बसू नयेत, यासाठी उमेदवारांनी ओळखपत्राच्या मुळ प्रतिसह एक झेरॉक्सची प्रत घेऊन जाणे अनिवार्य होते. तसेच विवाहित महिला उमेदवारांची ओळख पटावी यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेणे आवश्‍यक होते, पण अनेक उमेदवारांनी केवळ मुळ ओळखपत्र व इतर कागदपत्र सोबत ठेवले, झेरॉक्स प्रत नसल्याने त्यांना अडविण्यात आले. तर काहींनी केवळ झेरॉक्सची प्रतच सोबत ठेवली होती. त्याचा फटका त्यांना बसला. काही जणांनी कागदपत्र, झेरॉक्स प्रत तयार करण्यासाठी धावपळ केली. पण वेळ अपुरा असल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले.

कॉपीसाठी मोबाईल, हेडफोनचा वापर
एनडीएमधील केंद्रावर पवन मारक या उमेदवाराने परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करून त्याद्वारे बाहेर असलेला त्याचा मित्र अनिल भारतीला प्रश्‍नपत्रिकेचे फोटो पाठवून पेपर सोडवत होता. त्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. पवन उत्तम मारक (वय २५, रा. औरंगाबाद) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याचा साथीदार अनिल भारती (रा. जालना) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तुषार नामदेव बोरावके (वय ३१, रा. नऱ्हे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पुणे महापालिकेने सहा पदांची सरळसेवेने भरती सुरू केली आहे. त्याचा लेखी परीक्षेचा टप्पा आज पूर्ण झाला आहे. एकूण ७७.३२ टक्के उमेदवारांनी हजेरी लावली. परीक्षेला येताना मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेऊन येणे अनिवार्य असल्याचे हॉल तिकिटावर लिहिले होते. पण अनेकांनी ते न आणल्याने परीक्षा देता आली नाही. कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
- सचिन इथापे, उपायुक्त, सेवक वर्ग विभाग

पदांची संख्या, एकूण उमेदवार, एका जागेसाठी उमेदवार
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५ ----१२ हजार ७०४ ---------९४.१०
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ५-------१ हजार ४६९--------२९३.८
- कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) ४-------९७ -------२४.२५
- सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक १०० ---------२ हजार ३९३ ---------२३.९३
- लिपिक २०० -----------५० हजार ९२-------२५०.४६
- सहाय्यक विधी अधिकारी ४ ----४९९ --------------१२४.७५
- एकूण पदे - ४४८ -----------६७,२५४----------१५०.१२