शैक्षणिक शुल्क माफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक शुल्क माफ
शैक्षणिक शुल्क माफ

शैक्षणिक शुल्क माफ

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण होईपर्यंत शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
कोरोनाने शैक्षणिक क्षेत्रावर दीर्घकालीन परिणाम केले असून, पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांसमोर तर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पाटील म्हणतात, ‘‘कोरोना काळात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफीचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याची यावर्षीही काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात यावी.’’ विद्यार्थी हित लक्षात घेता, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही दिल्याचे पाटील यांनी ट्वीटरद्वारे सांगितले आहे.

प्राध्यापक भरतीकडेही लक्ष द्या...
चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत करत असतानाच नेटकऱ्यांनी त्यांना प्राध्यापकांच्या रिक्त पदांचीही आठवण करून दिली. महेश चोंडे म्हणतात, ‘‘अनुदानित महाविद्यालयात नियमित प्राध्यापक भरती होत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असून, महाविद्यालयात शिकायला येणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचा भविष्याचीही चिंता असू द्या साहेब.’’ राज्यातील सुमारे ६० टक्के अनुदानित प्राध्यापकांची पदे रिक्त असून, प्राध्यापक भरतीसाठी अनेक संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही भूमिका घेत आहे.

विनाअनुदानित महाविद्यालयांचे काय?
शुल्कमाफी संदर्भातील प्रत्यक्ष अध्यादेश जरी यायचा बाकी असला, तरी विना-अनुदानित महाविद्यालयातील अशा पाल्यांचे शुल्क माफ होणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या बद्दल अजून कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही.

करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी संदर्भात राज्य सरकारचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. या संबंधी आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. आता ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेली आहे. त्याचा परतावा तत्काळ द्यावा. तसेच या संदर्भातील तातडीने परिपत्रक काढावे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँडस
-------------------------