दिवाळीनंतरच विमानांचे उड्डाण वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनंतरच विमानांचे उड्डाण वाढणार
दिवाळीनंतरच विमानांचे उड्डाण वाढणार

दिवाळीनंतरच विमानांचे उड्डाण वाढणार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः दिवाळीनंतरच पुणे विमानतळावरून विमानांच्या उड्डाणात वाढ होणार आहे. पुणे विमानतळ प्रशासनाने अद्याप हिवाळी हंगामातील वेळापत्रक (विंटर शेड्यूल) अधिकृतरित्या जाहीर केले नाही; मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ ऑक्टोबरपासून त्याला सुरवात होणार आहे. यात विमानांच्या उड्डाणाच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. केवळ देशांतर्गतच नाही तर थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील वाढतील. सध्या केवळ दुबईसाठी विमानसेवा आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत २८ ऑक्टोबरच्या आधीच बहुमजली मोटार पार्किंग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
गेल्या काही दिवसांत पुणे विमानतळावरच्या विमानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी तब्बल १७२ विमानांची वाहतूक झाली. गेल्या अडीच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या होती. यंदाच्या हिवाळी हंगामामध्ये विमानांची संख्या यापेक्षा अधिक असणार आहे. सर्वाधिक उड्डाणे रात्री होतील. विमान कंपन्या त्याचे वेळापत्रक बनवीत आहे. वेळापत्रक तयार झाल्यावर नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) पाठवून त्यांची मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर हिवाळी वेळापत्रक लागू केले जाईल. प्रत्येक विमानतळाचा वेगळे असा हिवाळी वेळापत्रक असते. पुणे विमानतळाचा २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे
पुणे विमानतळावरून सिंगापूर, दोहासाठी प्रत्येकी एक तर दुबईसाठी दोन फ्लाइट असतील. हिवाळी वेळापत्रकामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या केवळ दुबईसाठी सेवा आहे. आता त्यात सिंगापूर व दोहा देखील समावेश होणार आहे. पुण्याहून थेट सिंगापूर व दोहाला विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांना मुंबई, दिल्लीहून जावे लागणार नाही. मुळे प्रवाशांच्या वेळेत व खर्चात देखील मोठी बचत होणार आहे.

बहुमजली मोटार पार्किंगचे काम पूर्ण झाले आहे; मात्र त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. लवकरच ती तारीख जाहीर करू. हिवाळी वेळापत्रक सुरू होण्यापूर्वी मोटार पार्किंगचा वापर सुरू होईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ