आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पुणे महापालिकेत मॉकड्रील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे 
पुणे महापालिकेत मॉकड्रील
आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पुणे महापालिकेत मॉकड्रील

आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पुणे महापालिकेत मॉकड्रील

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः महापालिकेत सायंकाळी पाच वाजता प्रशासकीय कामाची गडबड सुरू असताना अचानक एकामागे एक स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. साखळी बॉम्बस्फोट झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. सुरक्षा रक्षकांनी नागरिक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना इमारतीच्या बाहेर पळा, असे सांगण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. सुरुवातीची चार-पाच मिनिटे सर्वांच्याच चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पण, हे मॉकड्रील असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्ताने आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे महापालिकेत गुरुवारी मॉकड्रील घडवून आणले. त्याबाबत जास्त वाच्यता न करता मोजके अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनाच याबाबत माहिती होती. त्यामुळे या घडलेल्या प्रसंगामुळे खराखुराच प्रसंग असल्याची स्थिती निर्माण झाली. दुसऱ्या मजल्यावर एकामागे एक स्फोटाचा आवाज करण्यात आला. पुढील १० मिनिटात संपूर्ण इमारत रिकामी झाली. अवघ्या चार मिनिटांत अग्निशमन दलाचा बंब महापालिकेत आला. त्याचसोबत ७० मीटर उंच शिडी असलेली ब्रांटो गाडी, रेस्क्‍यू व्हॅन, रूग्णवाहिकांचा वापर करण्यात आला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सचिन इथापे, गणेश सोनूने, अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अग्निशमन दलातील ४० कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यात सहभागी झाले होते.