आणखी एका तरूणाने जीव गमावल्याचे उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी एका तरूणाने 
जीव गमावल्याचे उघड
आणखी एका तरूणाने जीव गमावल्याचे उघड

आणखी एका तरूणाने जीव गमावल्याचे उघड

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ऑनलाइन माध्यमाद्वारे ओळख झालेल्या तरुणाची नग्नावस्थेतील छायाचित्रे (सेक्‍सटॉर्शन) प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे धनकवडीतील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणानेही या प्रकारामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तरुणाने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात एका तरुणीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलानेही तो राहात असलेल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुलाच्या भावाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन इन्स्टाग्रामवरील अनोळखी प्रिथा यादव नावाच्या तरुणीसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाशी इन्स्टाग्रामवर प्रिथा यादव नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. दरम्यान, इन्स्टाग्रामवरील तरुणीने संबंधित तरुणास त्याचे अर्धनग्न छायाचित्र पाठवले. संबंधित छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी एका मोबाईलवर गुगल पे द्वारे साडे चार हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतरही त्यास बदनामीची भीती दाखवून, त्याच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करीत त्यास मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. या प्रकाराला कंटाळून तरुणाने २८ सप्टेंबर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास तो राहात असलेल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, तरुणाचा अंत्यसंस्कार विधी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधित तरुणी व तिच्या साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
एकट्या असलेल्या व कुटुंबात, मित्र मैत्रीणींकडून प्रेम, जिव्हाळ्याची पूर्तता न झालेले तरुण आपली भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी समाज माध्यमांमधील व्यक्तींशी जवळीक साधतात. त्यातूनच ‘सेक्‍सटॉर्शन’सारख्या घटनांमुळे बदनामीची भीती, ताणतणाव, नैराश्‍य येऊन आत्महत्येसारख्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी तरुणांनी कुटुंबीय, मित्र -मैत्रिणींशी मोकळपणाने बोलले पाहिजे. जवळच्या व्यक्तींना, पोलिसांना याबाबत सांगितल्यास योग्य मार्ग निघू शकेल. त्यादृष्टीने कुटुंबीयांनीही काळजी घ्यायला हवी.
डॉ. अर्चना जावडेकर, मनोविकारतज्ज्ञ.