खासगी बस, ट्रॅव्हल्सची बेकायदेशीर भाडेवाढ थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बस, ट्रॅव्हल्सची बेकायदेशीर भाडेवाढ थांबवा
खासगी बस, ट्रॅव्हल्सची बेकायदेशीर भाडेवाढ थांबवा

खासगी बस, ट्रॅव्हल्सची बेकायदेशीर भाडेवाढ थांबवा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः खासगी बस, ट्रॕव्हल्सकडून दिवाळीच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून सामान्य प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, तसेच प्रवाशांना लुटणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसने केली आहे.
पुणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस प्रथमेश आबनावे, महासचिव वैष्णवी किराड, प्रदेशचे सरचिटणीस अक्षय जैन, आनंद दुबे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.
दिवाळीसाठी पुण्यातून बाहेरगावी खासगी बस आणि ट्रॅव्हल्सतर्फे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यार्थी आणि नोकरदार अधिक आहेत. सणाच्या तोंडावर केलेल्या या भरमसाट भाडेवाढीमुळे दिवाळी साजरी करण्याआधीच दिवाळे निघेल, अशी परिस्थिती आहे. तसेच खासगी बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार अॅक्टनुसार केली असून, ती एसटी भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक आहे. म्हणजेच एसटीचे भाडे २०० असेल, तर खासगी बस चालकांना ३०० रुपये तिकीट घेता येते. त्यामुळे वेळीच प्रशासनाने यात लक्ष घालावे आणि अकारण भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा १८ ऑक्टोबरला आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रथमेश आबनावे यांनी दिला.


या आहेत मागण्या:
- जादा भाडे आकारणी करणाऱ्या बस चालकांची नोंदणी रद्द करा
- नियमानुसार भाडे आकारणी दरपत्रकाची जागृती करणारे फलक लावा
- तक्रार आल्यास शहानिशा करून प्रवाशाला २४ तासात न्याय द्या
- पथक तयार करून भाडे आकारणीतील अनियमितता तपासा
- अवास्तव भाडे आकारणाऱ्या बस, ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करा