जयंत पवार यांच्या साहित्यातील स्त्रीवादाकडे दुर्लक्ष ः संध्या नरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पवार यांच्या साहित्यातील स्त्रीवादाकडे दुर्लक्ष ः संध्या नरे
जयंत पवार यांच्या साहित्यातील स्त्रीवादाकडे दुर्लक्ष ः संध्या नरे

जयंत पवार यांच्या साहित्यातील स्त्रीवादाकडे दुर्लक्ष ः संध्या नरे

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः ‘‘जयंत पवार यांच्या साहित्याची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चिकित्साच झाली नाही. त्यांचे ‘माझं घर’ नाटकातील ‘विभा’ ही नायिका स्त्रियांच्या माहेर ते सासर आणि विवाहविच्छेद झाल्यास पुन्हा माहेर, या विस्थापनाला विरोध करते. ‘अधांतर’ या नाटकातील नायिका माझ्या नवऱ्याचे पैसे मलाच मिळाले पाहिजे, यासाठी स्वतःच्या मुलाविरुद्धही संघर्ष करते. मात्र या स्त्रीवादाची चांगली किंवा वाईट, कोणतीच समीक्षा झाली नाही’’, अशी खंत लेखिका संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केली.

लेखक-नाटककार जयंत पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयातर्फे आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, नाटककार मकरंद साठे आणि कवी गणेश विसपुते सहभागी झाले होते. प्रभावळकर म्हणाले, ‘‘अनेकदा जयंत पवार यांनी लिहिलेली समीक्षा वाचून नाटक पाहायला जायचो. कधी-कधी नाटक पाहून आल्यानंतर त्याची समीक्षा वाचून माझ्या मतांची पडताळणी करायचो. त्यांच्या लेखनाने समीक्षा वाचणाऱ्या नाटकाविषयीची वेगळी दृष्टी मिळायची. वाचकांच्या जाणिवा जागृत करणारे लेखन असायचे. तो अफाट लेखक होता.’’

साठे म्हणाले, ‘‘राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि नाटक या विषयांवर आम्ही छान बोलायचो. पण, दुर्दैवाने मी जयंतचा जवळचा मित्र होऊ शकलो नाही. समकालीन आणि सार्वकालिक अभिजात म्हणून जयंतच्या नाटकांकडे पाहावे लागेल.’’ विसपुते म्हणाले, ‘‘जयंत पवारांच्या जाण्याने आपण काय गमावले, हे मराठी साहित्य व्यवहारातील लोकांना अद्याप पुरेसे कळलेले नाही. त्यांनी मराठी कथांना, नाटकांना वेगळे वळण दिले. त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन करून आपल्याला काही वेगळी दिशा सापडते का, ते पाहायला हवे.’’ उत्तरार्धात जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ आणि ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकातील काही प्रसंगांचे अभिवाचन ज्योती सुभाष, शशांक शेंडे, नीता शेंडे, कृतार्थ शेवगावकर आणि सहकाऱ्यांनी केले.