पावसात तुंबलेल्या रस्त्यांची चौकशी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसात तुंबलेल्या रस्त्यांची चौकशी होणार
पावसात तुंबलेल्या रस्त्यांची चौकशी होणार

पावसात तुंबलेल्या रस्त्यांची चौकशी होणार

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी धुव्वाधार पाऊस झाल्याने जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी तुंबले. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातंर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले असतानाही पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘यंदा पावसाचे गणित कळतच नाही. रस्त्यावर दिवसभर पाऊस पडला तर पाणी वाहून जाईल पण एकाच वेळी धुव्वाधार पाऊस झाला आहे. रस्त्याच्या पाणी वाहून जाण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पाणी रस्त्यावर आले. तरीही या पावसाळ्यात दोन-तीन वेळा असा प्रकार घडला असल्याने त्याची चौकशी करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘ढाल-तलवार’ चिन्हावर घेतलेल्या आक्षेपाबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. पुण्यात ‘सेक्सटॉर्शन’च्या प्रकारामुळे दोन युवकांच्या आत्महत्या झाल्याबाबत विचारले असताना पाटील म्हणाले,‘‘या आठवड्यात पालकमंत्री म्हणून मी सर्वच विषयांचा आढावा घेणार आहे. त्यात पोलिस आयुक्तालयाचा आढावा घेताना या प्रकरणी चर्चा होईल.’’

विरोधकांकडून सरकार पडेल असे सातत्याने म्हटले जाते, याबाबत उत्तर देताना पाटील म्हणाले,‘‘सरकार स्थापन होऊन शंभरपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. परंतु पहिल्या दिवसांपासून अजित पवार आणि जयंत पाटील तर कधी-कधी नाना पटोले ‘हे सरकार पडेल’ असे बोलत आहेत. पण तसे काही झाले नाही. तसेच १० अपक्ष आमदार आमच्या सोबत आहेत. आता कोणी नाराज नाही, परंतु अशा नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्याकडे आहे.’’

शुल्कवाढीबाबत चर्चा होणार

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. २० हजार पोलिस भरती आणि दोन हजार ७२ प्राध्यापकांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच विविध विभागांना त्यांच्या रिक्त जागांचा तपशील मागविण्यात आल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढीबाबत विद्यापीठ प्रशासन सर्व विद्यार्थी संघटनांशी चर्चा करून मार्ग काढेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

S99253