
मुसेवाला हत्या प्रकरणाचे ‘पुणे कनेक्शन’
मंचर/पुणे, ता. ७ ः पंजाबचे प्रसिद्ध गायक व काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील ‘पुणे कनेक्शन’ अखेर सोमवारी उघड झाले. मुसेवाला यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दिल्लीच्या लॉरेन्स बिष्णोई टोळीतील आठ आरोपींमध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये आंबेगावातील सराईत गुन्हेगार संतोष जाधव याच्यासह सौरभ महाकाळ यांचा समावेश असून, ते दोघेही फरारी आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांसह पंजाब पोलिस त्यांच्या मागावर आहेत. पंजाब पोलिसांनी जाधवच्या घरी रविवारी तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे.
संतोष जाधव (वय २४, रा. पोखरी, आंबेगाव) व सौरभ महाकाळ (रा. मढ, पारगाव, जुन्नर) अशी मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. मुसेवाला हे २९ मे रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावातून त्यांच्या कारमधून जात होते. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या टोळक्याने त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. दिल्लीतील गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने त्याच्या सहकाऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची हत्या केल्याचे त्याच्या चौकशीतून पुढे आले. हत्या करणाऱ्यांमध्ये पंजाबमधील तीन, राजस्थानातील तीन व पुण्यातील संतोष जाधव व सौरभ महाकाळ या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. जाधव हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. मात्र, महांकाळ याच्याबाबतची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
- बाणखेले खून प्रकरणात जाधव फरारी
जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. प्रारंभी तो भीमाशंकरजवळील कोंढवळ येथे वास्तव्य करीत होता. त्याने १६ व्या वर्षीच कळंबच्या माजी सरपंचावर खुनी हल्ला केला होता. त्यानंतर त्याने पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय २४, रा. पांढरीमळा, मंचर) याचा एक ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी एक वाजता एकलहरे गावाजवळ पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. त्यामध्ये नऊ जणांना अटक झाली, तर जाधव हा तेव्हापासूनच फरारी आहे. मंचर पोलिस मार्च महिन्यात त्याच्या शोधासाठी पंजाबमध्ये गेले होते. त्याच्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, लूटमार, बाल लैंगिक अत्याचार असे गुन्हे दाखल असून, ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. मुसेवाला प्रकरणामध्ये मंचर पोलिसांनी पंजाब पोलिसांना जाधवबाबत माहिती दिल्यानंतर त्यांचा सहभाग उघड झाला.
- लॉरेन्स टोळीशी संपर्क
बाणखेले खून प्रकरणात फरार झाल्यानंतर जाधव हा राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेश या परिसरात स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार करून वास्तव्य करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. राजस्थानमधील जवाहरनगर, श्रीगंगानगर येथे त्याने खंडणीच्या प्रकरणातून एका व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार केला होता. दरम्यान, जाधव हा कारागृहामध्ये असताना त्याचा लॉरेन्स टोळीच्या सदस्यांशी संपर्क झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘‘संतोष जाधव याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध ‘मोका’नुसार कारवाईदेखील केली आहे. तो एक वर्षापासून फरारी आहे. महाकाळविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे की नाही, याचा तपास सुरू आहे.’’
- अशोक शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ग्रामीण पोलिस
MAC22B05681, MAC22B05680
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03537 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..