डेंगीमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगीमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ
डेंगीमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ

डेंगीमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : पुणे शहरात डेंगीचे रुग्ण गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत असल्याने प्लेटलेट्सच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण रक्तपेढ्यांनी नोंदविले. मात्र, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट्स मिळतील अशी व्यवस्था आतापर्यंत करण्यात यश आले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
शहरात या वर्षभरात डेंगीचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोचली आहे. त्यापैकी सुमारे ७० टक्के रुग्ण या पावसाळ्यातील आहे; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. काही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. त्यापैकी काही रुग्णांना प्लेटलेट्सची गरज लागते, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
या बाबत डॉ. पराग साबणे म्हणाले, ‘‘आतापर्यंत डेंगीचे रुग्ण वाढत होते. पण, उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होते. बाह्य रुग्ण विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात येत; मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातही काही रुग्णांना प्लेटलेट्स द्याव्या लागत आहेत.’’
दरवर्षी जून-जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढलेली असते. गेली दोन वर्षे कोरोना उद्रेक होता. ही वर्ष त्याला अपवाद ठरली. या दरम्यान डेंगीमुळे प्लेटलेट्सची मागणी वाढते, असे निरीक्षण रक्तपेढ्यांतर्फे नोंदविण्यात आले.
या वर्षी डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरीही आतापर्यंत प्लेटलेट्सची मागणी फारशी वाढलेली नव्हती. त्यामुळे प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला नव्हता; मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून प्लेटलेट्ची मागणीत काहीशी वाढ झाली आहे. मागणीप्रमाणे प्रत्येक रुग्णाला पुरवठा करण्यात यश येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...तर पुरवठ्यात अडथळा येईल
दिवाळी असल्याने पुढच्या आठवड्यात रक्तदान शिबिरांची संख्या कमी आहे. अशा वेळी रुग्णांची संख्या वाढून प्लेटलेट्सची मागणी वाढल्यास त्यानुसार पुरवठा करण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता रक्तपेढ्यांतर्फे करण्यात आली. त्यामुळे दिवाळी दरम्यान रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.