जून, ऑक्टोबरमध्ये वाढतोय पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जून, ऑक्टोबरमध्ये वाढतोय पाऊस
जून, ऑक्टोबरमध्ये वाढतोय पाऊस

जून, ऑक्टोबरमध्ये वाढतोय पाऊस

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः गेल्या पाच दशकांमध्ये शिवाजीनगर येथे पावसाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये जून आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याची बाब भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार स्पष्ट होते.

भारतीय उष्णकटीबंधिय हवामानशास्त्र संस्थेचे माजी शास्त्रज्ञ व ‘टायफून रिसर्च सेंटर’ येथे कार्यरत विनीत कुमार यांनी याबाबत सांगितले, ‘‘शिवाजीनगरमध्ये गेल्या ३० वर्षांतील प्रत्येक दशकातील सरासरी पर्जन्यमानावरून दिसून येते की जून आणि ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यात ऑक्टोबरमध्ये २४ तासांत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात काही वर्षांत वाढ दिसून आली. मागील दहा वर्षांमधील स्थिती पाहता, ऑक्टोबरमध्ये तीनदा २४ तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यंदाही ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत १०० मिमीहून अधिक पाऊस पडला असून या वर्षी सलग चौथ्यांदा ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.’’

यंदा १ जून ते १६ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. साधारणपणे या कालावधीत जिल्ह्यात ५९.५ मिमी इतका पाऊस पडतो. मात्र यंदा ८१.९ मिमी इतका पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३८ टक्के अधिक पाऊस पडल्याचे ही त्यांनी सांगितले.

जून ते ऑक्टोबरमध्ये पडणारा पाऊस (मिमीमध्ये)
दशक - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर
१९७१-८० - १३०.६ - १५९.८ - १२९ - १४३.८ - ५८
१९८१-९० - १२९.२ - १६५.३ - १२८.५ - १६६.१ - ७६
१९९१-२००० - २०१.८ - १८६.१ - १०७.२ - १२१.९ - १०४.६
२००१-१० - १९२.६ - १९०.६ - १९५.३ - १५०.५ - ७७.९
२०११-२० - १३८.५ - १७९.१ - ११८.३ - ११८.४ - ८३.६

मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीच्या प्रवासासाठी हवामान पोषक असून रविवारी (ता. १६) मॉन्सून डहाणू, बुलडाणा येथून बाहेर पडला आहे. दरम्यान, हवामान पोषक असल्याने पुढील दोन दिवसात मॉन्सून विदर्भ व राज्याच्या आणखीन काही भागातून काढता पाय घेणार आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असताना राज्यातील बऱ्याच ठिकाणी सध्या ढगाळ वातावरणाची निर्मिती होत असून पाऊस पडत आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सिमी लामडिंग, कैलासशहर, बर्हामपूर, कानके, बिलासपूर, ब्रम्हपुरी, बलडाणा आणि डहाणू येथे कायम आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.