पुण्यातील बाजारपेठांत दिवाळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील 
बाजारपेठांत 
दिवाळी!
पुण्यातील बाजारपेठांत दिवाळी!

पुण्यातील बाजारपेठांत दिवाळी!

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर आल्याने रविवारी खरेदीसाठी नागरिकांनी पुण्याच्या मध्यभागात तोबा गर्दी केली होती. दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या सुटीचा मुहूर्त साधत सजावटीच्या सामानासह कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तूंची नागरिकांनी खरेदी केली. आबालवृद्धांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, तुळशीबाग, मंडई परिसर फुलून गेला होता. सकाळपासूनच नागरिकांनी सहकुटुंब खरेदीला येण्यास सुरुवात केली होती. दुपारी व सायंकाळी तर या रस्त्यांवर चालणेही अवघड झाले होते. पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते.
‘‘दोन वर्षांत कोरोनामुळे लोकांना ऑनलाइन खरेदीची सवय लागली असेल, असे वाटले होते; मात्र तुळशीबागेत येऊन खरेदी केल्याशिवाय नागरिकांच्या मनाचे समाधान होत नाही, हे आज दिसून आले. दिवसभर खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याने विक्रेत्यांना अक्षरशः जेवायला देखील उसंत मिळाली नाही. मात्र चांगला व्यवसाय झाल्याच्या समाधानानेच आमचे पोट भरले’’, व्यावसायिक मोहन साखरिया सांगत होते. शहराच्या मध्यभागातील बहुतांश व्यावसायिकांची हीच प्रतिक्रिया होती.
रविवारी दिवसभर दुकानात ग्राहकांची वर्दळ होती. सकाळी दहा-अकरा वाजेपासूनच दुकान गजबजले होते. दोन वर्षांनंतर प्रथमच एवढी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे यंदा चांगला व्यवसाय झाला. दिवाळीची खरेदी असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता, असे व्यावसायिक किरण गाला यांनी सांगितले.