नियुक्तीसाठी कार्यपद्धती निश्चित तासिका तत्त्वावरील अध्यापकांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियुक्तीसाठी कार्यपद्धती निश्चित
तासिका तत्त्वावरील अध्यापकांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय
नियुक्तीसाठी कार्यपद्धती निश्चित तासिका तत्त्वावरील अध्यापकांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय

नियुक्तीसाठी कार्यपद्धती निश्चित तासिका तत्त्वावरील अध्यापकांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : बहुप्रतिक्षेत असणारी तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीसाठीची कार्यपद्धती राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निश्चित केली आहे. त्यानुसार, या अध्यापकांना त्यांचे मानधन संबंधित महाविद्यालयामार्फत थेट बॅंक खात्यात जमा करण्याचे आणि पूर्णवेळ रिक्त पदासाठी दोनच तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नेमणुका करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीच्या विविध मागण्यांबाबत तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २७ जून २०२१ रोजी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यात ‘तासिका तत्त्वाच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी,’ असे आदेश मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार या धोरणाचा आढावा घेऊन, नवीन पर्यायी धोरणाबाबत सरकारला शिफारस करण्यासाठी १० ऑगस्ट २०२१च्या शासन निर्णयानुसार उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने राज्य सरकारसमोर २१ फेब्रुवारी २०२२ ला अहवाल सादर केला. त्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या धोरणासंदर्भात नऊ शिफारशी करण्यात आल्या. त्यात या अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आणि तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीसाठी कार्यपद्धती करणे, या शिफारशी सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानुसार कार्यपद्धती संदर्भातील अध्यादेश शिक्षण विभागाने काढला आहे.
यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून या अध्यापकांच्या सेवा उपलब्ध होऊन शैक्षणिक कामकाज सुरळितपणे पार पाडता यावे, यासाठी या अध्यापकांची प्रत्येक वर्षी नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित केली आहे.

*अशी असेल कार्यपद्धती*
- मानधन वेळेवर देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक
- मानधन संबंधित महाविद्यालयामार्फत थेट बॅंक खात्यात जमा होणार
- एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासिकांचा सोपविणार कार्यभार
- अध्यापक म्हणून नियुक्तीसाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकारनुसार अर्हता बंधनकारक
- नियुक्ती ही शैक्षणिक वर्षासाठी मर्यादित
...............
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात निर्णय जाहीर झाला. निर्णयात प्राध्यापकांना निश्चित रक्कमेचे दरमहा मानधन मिळण्याची शाश्वती अपेक्षित होती. पण त्याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्याशिवाय तासिका ही नेमकी कशाप्रकारे ग्राह्य धरण्यात येणार, हेही सांगण्यात आलेले नाही. या प्राध्यापकांची त्याच महाविद्यालयांमध्ये पुनर्नियुक्ती करायची असल्यास नव्याने कार्यपद्धती राबविण्यात येऊ नये, असे म्हणणे होते, परंतु ते नाकारण्यात आले आहे.
- प्रा. सुरेश देवढे पाटील, राज्य समन्वयक, नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती