‘भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन
‘भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन

‘भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

‘भाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १७ ः व्यावसायिक द्वारकादास माहेश्वरी यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर प्रवास टाकणाऱ्या ‘भाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी द्वारकादास यांच्या पत्नी निर्मला माहेश्वरी, मुलगा श्यामकुमार माहेश्वरी आणि मॅजेस्टिक लँडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी, उद्योजक जयंत शाह, प्रकाश धारिवाल, शेखर मुंदडा, दीपक मानकर, विजयकांत कोठारी आणि विशाल चोरडीया आदी उपस्थित होते. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, ‘‘वयाच्या बाराव्या वर्षापासून व्यवसायाशी जोडले गेलेले, केवळ एक लाख रुपये घेऊन धुळ्याहून पुण्यात आलेले द्वारकादास यांनी मेहनत आणि शिस्त यांच्या जोरावर यशस्वी वाटचाल करत देशभरात ५० दुकाने सुरू केली. जीवनातील वाटचाल कशी असावी, याचे ते उत्तम उदाहरण आहेत.’’

रवींद्र बेडकीहाळ यांना ‘जिद्द जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
पुणे, ता.१७ ः महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांना आडकर फाउंडेशनचा २०२२ चा ‘जिद्द जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद अडकर यांनी दिली. गुरुवारी (ता. २०) सकाळी ११.३० वाजता भारती विद्यापीठ भवनच्या मुख्य कार्यालयातील आठव्या मजल्यावरील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

व्यक्तिमत्त्व समृद्धीसाठी वाचन आवश्यक ः डॉ. देशपांडे
पुणे, ता. १७ ः ‘‘वाचनाने मिळणाऱ्या आनंदाची तुलना अन्य कशाशीच करता येणार नाही. केवळ आपापल्या विषयापुरते किंवा परीक्षेपुरते नव्हे, तर सर्वांगीण वाचनाची सवय ही व्यक्तिमत्त्वाच्या समृद्धीसाठी आवश्यकच आहे’’, असे मत जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी नुकतेच व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. डॉ. टी. के. हातेकर लिखित ‘मेंटल हेल्थ ऑफ अॅडल्टस इश्यूज अॅण्ड चॅलेंजेस’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे, निवृत्त पोलिस अधिकारी मोहन यादव, डॉ. सविता पाटील आदी उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रेश्मा दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथपाल प्रा. बद्रीनाथ ढाकणे यांनी आभार मानले.