नको जीव, नकोच जगणे, आईवाचून जीवन मरणे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नको जीव, नकोच जगणे,
आईवाचून जीवन मरणे...
नको जीव, नकोच जगणे, आईवाचून जीवन मरणे...

नको जीव, नकोच जगणे, आईवाचून जीवन मरणे...

sakal_logo
By

जसजशी दिवाळी जवळ येऊ लागली, तसतशी प्राजक्ताच्या मनात घालमेल होऊ लागली. यंदाची दिवाळी आई एकटीच साजरी करणार, या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा यायचा. गेली कित्येक वर्षे दोघीच दिवाळी उत्साहात साजऱ्या करायच्या. घराच्या साफ-सफाईपासून फराळाचं करण्यापर्यंत दोघींचा उत्साह ओसंडून वाहायचा. फटाके उडवताना तर दोघींना आणखी मजा यायची. दरवर्षीची दिवाळी प्रकाशझोतात न्हावून निघायची. एकमेकींची काळजी घेत, प्रेमाच्या वर्षावात दोघीही न्हाऊन निघायच्या. एकमेकींशिवाय दोघींनाही घास कधी गोड वाटायचा नाही. इतकं त्यांच्यातील नातं अतूट होतं. या दोघी मैत्रिणीच आहेत, असं अनेकांना वाटायचं. दोघींतील प्रेमामुळे अंगणातील आनंदाचं झाड चांगलंच बहरलं होतं.
मात्र, सहा महिन्यांपूर्वी प्राजक्ताचं लग्न झालं आणि ती सासरी नांदायला आली आणि गावी आई एकटीच राहू लागली. आईच्या आठवणीने प्राजक्ताच्या मनात हूरहूर दाटून यायची आणि नकळत डोळ्यातून अश्रू यायचे.
‘‘मला आईची खूप आठवण येतेय. मला दोन दिवसांसाठी माहेरी सोडा.’’ प्राजक्ताने मोहनकडे हट्ट धरला.
‘‘अगं दिवाळीमुळे कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे मला शक्य नाही.’’ मोहनने म्हटले.
‘‘मी एकटी जाऊ का?’’ असं तिने विचारल्यावर ‘‘आई- बाबांना विचार.’’ त्याने तुटक उत्तर दिले. मात्र, दिवाळीच्या काळात आपले सासू- सासरे माहेरी जाण्यासाठी परवानगी देणार नाहीत, याची तिला खात्री होती. त्यामुळे तिने विषय काढला नाही. मात्र, मनातल्या मनात ती कुढत राहिली.
आई आजारी असून, तिला दवाखान्यात ॲडमिट केल्याचं कळल्यावर मात्र, तिच्या अश्रूचा बांध फुटला. त्यानंतर कोणाचाही विचार न करता तिने झटाझट कपडे बॅगेत भरले.
‘‘माझी आई आजारी आहे. मी तिला भेटण्यासाठी चाललेय.’’ असे सासू- सासऱ्यांना सांगून, त्यांच्या परवानगीची वाट न बघताच ती एसटीने गावी जायला निघाली. फाट्यावरून गावाकडे जाताना तीन किलोमीटरची वाटही तिला शेकडो मैलांसारखी वाटू लागली. आईला लवकर भेटायला जावे म्हणून ती अक्षरक्षः धावत सुटली. पंधरा- वीस मिनिटांतच ती घरात पोचली. बेडवरील आईला बघताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
तिने आईला मिठी मारली. ‘‘आई ! माझ्या काळजाच्या तुकड्याला काय झालंय गं.’’ असं म्हणून ती जोरजोरात रडू लागली.
आईचं अंग तापानं फणफणलं होतं. शेजारच्या शालन वहिनींनी डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या होत्या.
‘‘ताई, आईने तुमचाच धोसरा घेतला होता. तापातही सारखं ‘प्राजक्ताऽऽ प्राजक्ताऽऽ’ बरळत होत्या. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं आहे. बरं झालं तुम्ही आलात.’’ शालन वहिनींनी म्हटलं. मग प्राजक्ताने स्वयंपाक केला आणि आपल्या हाताने गरमागरम जेवण ती आईला भरवू लागली. तेवढ्यात मोहनही गाडी घेऊन आला.
‘‘प्राजक्ता, अगं मला कळवायचं तरी होतं.’’ मोहनने रागाने म्हटले.
‘‘तुम्ही जाऊ नका, असंच मला सांगितलं असतं.’’ प्राजक्ता म्हणाली.
‘‘बरं चल उरक लवकर. आपल्याला परत पुण्याला जायचंय.’’ मोहनने म्हटले.
‘‘मी माझ्या आजारी आईला सोडून कोठेही येणार नाही.’’ प्राजक्ताने घुश्‍श्‍यातच उत्तर दिले.
‘‘अगं, तुझ्या आईला घेऊनच आपण कायमस्वरूपी पुण्याला जायचंय. त्यांनी असं गावी एकटं राहणं, हे त्यांचा मुलगा म्हणून मला शोभणारं नाही. आईंना आपल्या घरी नेण्यासाठी आई-बाबांचीही परवानगी आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीच काय पण आगामी सगळे सण-उत्सव आपण जल्लोषात साजरे करू.’’ मोहनने असं म्हटल्यावर प्राजक्ताचे डोळे आनंदाने भरून आले.