चलन फाडण्यात वेळ घालवू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चलन फाडण्यात वेळ घालवू नका
चलन फाडण्यात वेळ घालवू नका

चलन फाडण्यात वेळ घालवू नका

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : शहरात वाहतुकीला शिस्त लावली पाहिजे. हे करताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना समज द्यावी. पण केवळ दंडात्मक कारवाईसाठी चलन फाडण्यात वेळ घालवू नका, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत. विधान भवनात सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शहरात प्रमुख रस्त्यांवर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिस चौकांमध्ये वाहतूक नियमन करण्याऐवजी दंडात्मक कारवाईवर भर देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या संदर्भात पाटील म्हणाले, ‘‘दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी प्रत्येक चौकामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी खासगी वॉर्डन नेमण्यात येतील. त्यांना महापालिका, मेट्रो आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावताना नियम मोडणाऱ्यांना समज द्यावी. केवळ चलन फाडण्यात वेळ घालवू नयेत, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.’’

विरोधकांच्या विकासकामांना कात्री नाही!
मागील सरकारच्या काळातील जिल्हा नियोजन समितीअंतर्गत काही विकासकामे रद्द केली आहेत. या संदर्भात पाटील म्हणाले, केवळ विरोधकांची विकासकामे म्हणून कात्री लावली जाणार नाही. परंतु सर्व विकासकामे तपासून कोणती करायची याबाबत निर्णय होईल. कोणालाही अन्याय झाला असे वाटणार नाही. वेळप्रसंगी ती कामे रद्द करण्यापेक्षा नवीन कामे देण्यात येतील.

‘दोन दादांमध्ये मतभेद नाहीत’
अजित पवार हे यापूर्वी पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील हे बहुतांश बैठकींना हजर नसत. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पवार गैरहजर होते. याबाबत विचारले असता, ‘‘मी त्यावेळी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे प्रवास खूप व्हायचा. कोरोनामुळे ऑनलाइन बैठका अधिक झाल्या. परंतु ‘डीपीडीसी’च्या बैठकीला हजर राहणार नाही, एवढे दोन दादांमध्ये मतभेद नाहीत,’’ असे पाटील यांनी नमूद केले.

पाणी वाहून जाण्याची रचना करावी!
एकाचवेळी पाऊस जास्त पडल्यास रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे रस्ते खराब होण्यासोबतच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याची रचना करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

टीकेवर भाष्य टाळले
‘शहरातील रस्ते केवळ पावसामुळे खराब झालेले नाहीत. तर, महापालिकेतील गेल्या पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे,’ असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर पाटील यांनी बोलताना ‘विरोधकांनी तसे म्हणायचे असते,’ असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.