मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता
मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता

मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. १८) दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. रविवारी (ता. १६) रात्री विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली होती. दरम्यान सोमवारी (ता. १७) सकाळी पुन्हा आकाश निरभ्र झाले होते. अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती देखील निर्माण झाली होती.
पुणे शहरात सोमवारी (ता. १७) ३०.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात किंचित घट झाली होती. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला असून अद्याप थंडीची चाहूल लागण्यास नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. कमाल तापमानात घट असली तरी किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस शहरात असेच चित्र कायम राहणार असून येत्या गुरुवारपर्यंत (ता. २०) पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. दुपारनंतर मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

राज्यात जोर कमी-अधिक
राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. तर पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. मंगळवारी (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत (ता. २०) येथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून नैॡत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. १८) ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढील ४८ तासांमध्ये विदर्भासह राज्यातील इतर काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.