कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर
कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर

कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षेचा लेखी निकाल आज सोमवारी रात्री जाहीर झाला. १२ हजार ७०२ उमेदवारांपैकी गुणवत्ता यादीतील पहिल्या १५० उमेदवारांची पहिली निवड यादी कागदपत्र पडताळणीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीत २०० पैकी १८० हे सर्वाधिक गुण आहेत. जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी कोणत्याही आमिषास बळी पडू नये असे, आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिकेतर्फे ४४८ पदांसाठी नोकरभरती करण्यात येत आहे. यामधील विविध पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले होते. यापैकी ६७ हजार २५४ जणांनी परीक्षा दिली असून, सरासरी ७७ टक्के उपस्थिती होती. ही परीक्षा आयबीपीएस या संस्थेने ऑनलाइन घेतली आहे. या परीक्षांपैकी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या दोन परीक्षांचा निकाल पूर्वीच जाहीर झाला असून सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. सहाय्यक विधी अधिकारी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांचा निकाल येत्या आठवड्याभरात जाहीर होईल. तर लिपिक पदासाठीचा निकाल दिवाळीनंतर जाहीर केला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १३५ जागा असून, त्यासाठी १२ हजार ७०२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये १८० गुणांचा पहिला उमेदवार आहे. एका जागेसाठी एकास तीन या प्रमाणे उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. एक सारखे गुण पडल्यामुळे ही संख्या काही प्रमाणात वाढू शकते.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गुणवत्ता यादीत पुढे असलेल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले आहे. उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावेत.’’
- सचिन इथापे, उपायुक्त, सेवक वर्ग विभाग

एजंटापासून सावधन
महापालिकेत नोकरी लावून देतो, कागदपत्र पडताळणीतील प्रक्रिया मॅनेज करून देतो, गुणवत्ता यादीत क्रमांक येईल अशी व्यवस्था करतो अशी बतावणी करून पैसे घेऊन नोकरी लावून देण्याचे अमिष दाखविण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे जे उमेदवार गुणवत्ता यादीत आले आहेत, त्यांनी अशा एजंटापासून सावध रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.