बचत गटांच्या उत्पादनांचा आजपासून खाद्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांच्या उत्पादनांचा 
आजपासून खाद्य महोत्सव
बचत गटांच्या उत्पादनांचा आजपासून खाद्य महोत्सव

बचत गटांच्या उत्पादनांचा आजपासून खाद्य महोत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी आणि पुणेकरांना अस्सल ग्रामीण दिवाळी फराळाची चव चाखता यावी, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) यांच्यावतीने दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य महोत्सवात पुणेकरांना अस्सल ग्रामीण दिवाळी फराळाची चव चाखण्याची संधी मिळणार आहे.

पुणे स्टेशन परिसरातील मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅंकेच्या (भूविकास बॅंक) आवारात येत्या मंगळवारपासून (ता. १८) तीन दिवस हा खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा बॅंकेचे अघ्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धन सिंग रावत यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) दुपारी दोन वाजता या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या, घरगुती उटणे आदी उत्पादनांच्या विक्रीचे प्रदर्शन हे पुणे शहरात तीन ठिकाणी आयोजित केले आहे. हे प्रदर्शन येत्या १८ ते २० आक्टोबर या कालावधीत नवीन जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय व मध्यवर्ती इमारतीच्या आवारात आयोजित केल्याचे प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी सांगितले.